विश्वसनीयता जपण्याचे डिजिटल मीडियासमोर मोठे आव्हान : राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे

177

The गडविश्व
नागपूर, २८ मार्च : आजच्या घडीला माध्यमांसमोर वेगवेगळी आव्हाने उभे आहेत. खास करून डिजिटल मीडियामध्ये झपाट्याने वाढ होत असतांना यांच्यासमोर विश्वसनीयता जपण्याचे मोठे आव्हान उभे असल्याचे चित्र असून एकदा जनतेचा विश्वास जर संपादन केल्यास यशाच्या शिखराकडे झेप घेेणे कठीण नाही. त्यामुळे डिजिटल मीडियातील पत्रकारांनी आधी विश्वास जिंकावा, असा संदेश राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी केला.
नागपुरातील नंदनवनमध्ये ‘माय खबर २४ युनिक डिजिटल मीडिया प्लॉटफॉर्म’च्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रीवेंस काैन्सिलचे अध्यक्ष तथा मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा, तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार महासंघाचे संतोष निकम, सिनेकलावंत राजेश चिटणीस, प्रज्वल भोयर उपस्थित होते. तसेच यावेळी कृष्णा शेंडे, SMIT Digital चे देवनाथ गंडाते, VNI चे संपादक राजेश खोब्रागडे सह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
पाहुण्याच्या हस्ते दीपप्रज्वलन करून गणेशवंदना झाल्यानंतर या उपक्रमाची भूमिका आणि उद्देश संचालक प्रितम मडावी यांनी विशद केली. तर, मंचावरील पाहुण्यांनी डिजिटल मीडियाची ताकद आणि व्याप्ती उलगडताना म्हटले की, आजच्या काळातील ही एक मोठी शक्ती आहे. या शक्तीचा उपयोग योग्य प्रकारे झाला तर डिजिटल मीडियातून क्रांती होऊ शकते. याच कल्पनेतून माय खबर २४ डिजिटल मीडिया आणि ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेची शक्ती, तिचा सध्या होत असलेला वापर, गैरवापर यावर बोट ठेवत निवेदिका ज्योती भगत यांनी या सोहळ्यांची रंगत वाढविली. कार्यक्रमाचे आभार माय खबर २४ प्रायव्हेट लिमिडेटचे फाऊंडर कृष्णा शेंडे मानले. आयोजनासाठी ऋतिक अलाम, भूपेंद्र शेंडे, स्वप्नील मडावी, जितेंद्र शेंडे यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओच्या माध्यमातून या डिजिटल मीडिया प्लॉटफॉर्मच्या उद्घाटन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. या उपक्रमासाठी हातभार लावणाऱ्या निर्मय इन्फ्राटेक ग्रुपचे नयन घाटे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
तसेच लोकार्पण सोहळ्याच्या दुसऱ्या सत्रात पत्रकारांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्यात बोलताना ब्लॉगर प्रीतम नगराळे यांनी उपस्थित असलेल्या पत्रकारांना त्यातील बारकावे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाने करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. तंत्रज्ञान आणि माहितीची योग्य सांगड घालून ब्लॉगिंग केल्यास तुम्ही चांगले करिअर करू शकता असेही नगराळे यांनी सांगितले.

(The gadvishva) (the gdv) (nagpur my khabr 24) (nitin gadkari)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here