The गडविश्व
नागपूर : पतीने पत्नीच्या तोंडावर अॅसिड फेकून तिला जखमी केल्याची घटना अजनी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या रामेश्वरी येथे आज सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. पत्नी निता (बदललेले नाव) आणि आरोपी पती सुरेश झेंगटे (४२) हे रामेश्वरी मध्ये राहतात. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यांना १२ वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांचा मुलगा आहे. निता ही आज शनिवारी सकाळी ९.३० वाजता सायकलने पोळ्या करण्याच्या कामासाठी जात होती.
काशी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या सुरेशने मंजुळा प्लाझा बिल्डिंगच्या बाजूला पत्नीच्या चेहऱ्यावर ग्लास मध्ये भरून आणलेले असिड फेकले. यात ती जखमी झाली. लगेच आजूबाजूच्या नागरिकांनी तिला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. ॲसिड फेकल्यानंतर सुरेश दुचाकीने फरार झाला. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त नुरुल हसन, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित आणि अजनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध घेणे सुरू केले आहे.