The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १६ मे : प्रत्येक गरिबाला घरकुल योजनेचा लाभ देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. परंतु आरमोरी तालुक्यातील सायगाव येथील नामदेव मारोती माकडे या दिव्यांग व्यक्तीचे राहते घर जीर्ण होऊन कोसळल्यानंतर प्रशासनाने त्याच्या घराचे सर्वेक्षण केले. मात्र ना शासकीय मदत मिळाली ना घरकुल मिळाले. यामुळे सायगांव येथील दिव्यांग नामदेव माकडे यांचे कुटूंब उघडयावर पडले आहे. उघड्यावर पडलेल्या नामदेव माकडे यांना प्रा. डॉ.के. टी. किरणापुरे यांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली.
नामदेवचे कुटुंब मोठे असून त्याला आई-वडील, पत्नी, दोन लहान मुले असून हा व्यक्ती अर्धा एकर शेतीवर मोल मजुरी करुन त्यातच मागील ३० वर्षा पासून वडिलोपार्जित मातीच्या घरात वास्तव्य करतोय. ०६ मे रोजी वर्तमानपत्रात “घर कोसळले, ना मदत मिळाली – ना घरकुल !”दिव्यांग व्यक्तीचे कुटुंब पडले उघड्यावर” या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच प्रशासनाने या गंभीर बाबीकडे कानाडोळा केला. मात्र आरमोरी येथील प्रा.डॉ.के.टी. किरणापुरे व त्यांच्या पत्नी सौ.रजनी किरणापुरे यांनी प्रत्यक्ष नामदेवच्या गावी जाऊन त्याच्या मोडक्या- तोडक्या घराची पाहणी करून दिव्यांग नामदेवच्या कुटुंबाची भेट घेऊन त्याच्या कुटुंबाला ३ हजार रुपयांची सानुग्रह निधी म्हणून भेट दिली. शासनाने या गरीब कुटुंबाला तात्काळ घरकुल देऊन होणारी जीवितहानी थांबवावी असेही यावेळी किरणापुरे यांनी सांगितले. दिव्यांग नामदेव माकडे यांना सानुग्रह निधी देतांना प्रा. डॉ.के. टी. किरणापुरे यांचे सोबत सायगाव ग्रा. प. चे उपसरपंच मनोज पांचलवार, पत्रकार रुपेश गजपुरे, ग्रा. प.कर्मचारी संदीप धोटे, पत्रकार हरेंद्र मडावी, उमेश माकडे, मारोती माकडे,आशा माकडे, उत्तरा माकडे, अनंता माकडे, अतुल माकडे आदी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.