देसाईगंज : रात्रीस खेळ चाले, वैनगंगा नदीतून अवैध रेती तस्करी, प्रशासन बनले मूकनायक

595

– रात्रो ८ नंतर सुरू होतो खेळ, रेती तस्करांना पाठबळ कुणाचे ?
The गडविश्व
देसाईगंज (कोंढाळा) , २२ मे : शासनाला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा घटक म्हणून गौणखनिजाकडे बघितले जाते. मात्र या गौणखनिजांची लूट अवैध व्यावसायिकांकडून होत असतांना मात्र महसूल विभाग तोंडावर रुमाल ठेवून मूकनायक बनून गप्प बसून असल्याचा प्रकार देसाईगंज तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील कोंढाळा पिंपळगाव घाटावरून अवैधरित्या ट्रॅक्टरद्वारे व इतर साधनांद्वारे रेतीचा उपसा करून तस्करी केली जात असल्याचे चित्र असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतांनाही याकडे महसूल विभाग प्रत्यक्ष कानाडोळा करत असल्याचे दिसते.
देसाईगंज तहसिल कार्यालयात काही दिवसांपूर्वी नव्यानेच तहसीलदार नियुक्त झाले आहेत. याचाच फायदा हे रेती तस्कर घेत असावे. महसूल विभागाच्या डोळेझाक पणाने मात्र अवैध रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.
देसाईगंज तालुक्यातील दरवर्षी नदिघाटांचे लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो तर सध्या स्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले असले तरी ही अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढलेले आहे. कोंढाळा पासून काही अंतरावर गावानजीकच वैनगंगा नदी असल्याने याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत.
रेती घाटामध्ये तस्करांच्या सातत्य रेती उपसामुळे रेतीच शिल्लक नसून आता माती दिसू लागली आहे तरीसुद्धा रेतीची तस्करी सुरूच आहे. या रेती तस्करीतून दर दिवशी लाखो रुपयाची उलाढाल होत असल्यामुळे अनेकांनी रेती तस्करीच्या व्यवसायात आपला जम बसविला आहे. तर अवैध रेतीच्या उपस्यामुळे नदी पात्र पोखरले गेले आहे.
तर रेती तस्करीवर राजकीय नियंत्रण असल्याच्याही चर्चा आहे. रात्रीस खेळ चालत असतांना त्याच्यावर कारवाई करण्याची ताकद तालुका व जिल्हा प्रशासनात उरली नसल्याचे सध्या सुरू असलेल्या रेती तस्करी वरून दिसून येते असल्याने सामान्य नागरिकही चाललेल्या तस्करी कडे कानाडोळा करून पाठ फिरवत असतो. त्यामुळे महसूल विभाग अवैध चाललेल्या रेती उपशाकडे गांभीर्य दाखवून त्यांच्यावर कारवाई करणार का ? अवैध रेती तस्करीला पाठबळ कुणाचे ? महसूल यंत्रणा अवैध रेती तस्करांच्या दावणीला बांधली गेली आहे काय ? रेती तस्करांवर आशीर्वाद कोणाचा ? असा प्रश्नांचा सुर सर्वसामान्य जनतेच्या मुखातून प्रकट होत आहे.

नदीत मुरूमाद्वारे बनवले रस्ते

अवैध रेती तस्करांनी रेतीची वाहतूक करण्याकरिता नदीपात्रात जंगल परिसरातीलच मुरूमाचा वापर करून चक्क रस्ते तयार केल्याचे दिसते. जंगल परिसरातूनच अवैध मुरूम उत्खनन केल्याने वनविभाग यावर कारवाई का करत नाही असा देखील सवाल उपस्थित होत असून रेती घाट पोखरल्याचे व्हिडीओ फुटेज तसेच नदीपात्रात रस्ता तयार करण्याकरिता वापरण्यात आलेल्या तसेच नदीपात्रात मुरुम आढळल्याचे व्हिडिओ फुटेच हाती लागले असून महसूल यंत्रणा आणि वनविभाग या रेती तस्करीला आळा घालतील काय याकडे आता लक्ष लागले आहे.©©©

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here