– देलनवाडी तंमुसचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, ३ जून : आरमोरी तालुक्यातील ग्रामपंचायत देलनवाडी अंतर्गत देलनवाडी येथील अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्याची मागणी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने आरमोरीचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
जंगलपरिसराचा आधार घेऊन दारूविक्रेते हातभट्टी लावून दारू गाळतात व लाखो रुपयांचा अवैध व्यवसाय करीत आहेत. परिणामी दारूच्या व्यसनाचे प्रमाण गावात वाढले असून अनेक कुटुंब उध्वस्त झाले आहेत. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊन युवक व्यसनाच्या मार्गाला गेल्याचे दिसून येत आहेत. ही गंभीर समस्या लक्षात घेता देलनवाडी तंमुस समितीने सभा घेऊन अवैध धंदे बंद करण्यासाठी ठराव घेतला. सोबतच पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करून त्वरित अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी, अन्यथा भविष्यात गावात, समाजात फार वाईट दुष्परिणाम होतील. येत्या काही दिवसात अवैध धंदे बंद न केल्यास महात्मा गांधी तंटामुक्त समिती उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा देण्यात आला. निवेदन देतेवेळी तंमुस अध्यक्ष विजय मोहुर्ले, माजी अध्यक्ष हरबाजी घोडमारे, रामदास गेडाम, मुक्तिपथ तालुका संघटक विनोद कोहपरे, आशुतोष भांडारकर आदी उपस्थित होते.