वडसा वनविभाग व्याघ्र प्रकल्प घोषित करा

539

– देवानंद दुमाने यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, १३ जून : गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व उद्योगविरहित जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील लोकाचा प्रमुख व्यवसाय शेती त्यामुळे वनावर आधारित मोहफुल, तेंदूपत्ता, रानभाजी व्यवसायावर शेतकरी अवलंबून आहेत. मात्र गेल्या पाच वर्षांपासून या जिल्यातील गडचिरोली, वडसा या वनविभागात वाघाची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने वडसा वनविभागात व्याघ्र प्रकल्प घोषित करा अशी मागणी देवानंद दुमाने यांनी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य गडचिरोली वनविभागातील गडचिरोली, आरमोरी, वडसा भागांना लागून असल्याने वैनगंगा नदीतून या वाघांचा शिरकाव जिल्ह्यात होताना दिसून येत आहे त्यामुळे वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा भाग वाघांच्या अधिवासासाठी अनुकुल झुडपी जंगल, बारमाही पाण्याची उत्तम सोय व शिकारीसाठी उपयुक्त क्षेत्र, काही प्रमाणात डोंगरदऱ्या असल्याने या क्षेत्रात वाघाचे प्रजनन व संगोपन यशस्वीरित्या होताना दिसून येत आहे. त्यामुळे नवीन वाघाच्या पिढ्या तयार होत आहेत. या भागात वाघाची दहशत असून वाघांच्या दहशतीचा उपयोग रोजगाराच्या वाटा शोधण्यात होऊ शकतो. शेती जंगलाला लागून असल्याने शेतकऱ्याचे शेतात नेहमी आवा – गमन सुरू असते त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष नेहमी घडून येत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे या भागात व्याघ्रबळीच्या घटना मोठ्याप्रमाणात घडतात.
वडसा वनविभागात मोर, अस्वल, हरीण, नीलगाय, चितळ, रानगवे, बिबट, रान कुत्रे, रानटी डुक्कर या प्राण्याची संख्या मोठ्याप्रमाणात असल्याने व्याघ्रप्रकल्प घोषित केल्यास या भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गुरवळा जंगल सफारी प्रमाणे याही भागात पर्यटनाला चालना मिळेल. वन्यजीव प्रेमीना संशोधनाच्या संधी उपलब्ध होवून शासनाला महसूल गोळा करता येवू शकतो. त्यामुळे जंगलालगत असलेल्या गावातील लोकांना रोजगार मिळाल्यामुळे गावकरी आत्मनिर्भर होऊन जंगल व वन्यजीव याविषयी आत्मीयता निर्माण होईल. मानव वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल. मिनी ताडोबा अशी ओळख निर्माण करता येऊ शकते. या सोबतच वडसा वनविभागातील आरमोरी परिक्षेत्रातील वघाळा हा गाव स्थलांतरित पक्ष्यांसाठी ओळखला जातो. पक्षी अभयारण्य स्थापन करून पक्षी सवर्धन करता येऊ शकतो. या ठिकाणी ओपन बिल स्टार्क, पेंटेड स्टार्क, व्हाईट इबीस,ग्रे हेरोन, लपविंग, शेल्डोम डक, इग्रेट, कॉर्मोरट यासारखे हजारो पक्षी या ठिकाणी एकत्र येतात घरटी बांधतात,प्रजनन व पिलांचे संगोपन करतात यांचा अभ्यास करण्याची संधी पक्षीप्रेमींना मिळेल पर्यटनामुळे या क्षेत्राचा विकास होईल पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे ताबडतोब व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी वृक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here