वाघाच्या हल्ल्यांची मालिका सुरूच : नवेगाव (लो) येथील इसमास केले ठार

1078

– परिसरात दहशतीचे वातावरण
The गडविश्व
सिंदेवाही, १५ जून : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव लोणखैरी येथील इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. रघुनाथ नारायण गुरनुले (३६) रा. नवेगाव लोनखैरी ता. सिंदेवाही जि. चदंपूर असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव-लोनखैरी येथील तिघेजण शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लाकूडफाटा आणण्यासाठी गावाशेजारील जंगलात गेले होते दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने रघुनाथ गुरनूले यांचेवर अचानक हल्ला चढवला. यात ते जागीच ठार झाले. यावेळी घाबरलेल्या इतर दोघांनी गावात धाव घेत घटनेची माहिती सांगितली असता वनविभागालाही घटनेबाबत माहिती देऊन गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी सिंदेवाहीकडे पाठविले. सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असून मृतकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अशा मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृतकाच्या पश्चातपत्नी, आईवडील व मुलगा असा आप्त परिवार आहे.
(the gadvishva, the gdv, chandrpur sindevahi navegao lonkhairi, tiger attack)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here