गडचिरोली : फर्निचर दुकानांवर धाडी ; लाखोंचा अवैध मुद्देमाल जप्त, क्षेत्रसहाय्यक निलंबित

2152

– क्षेत्रसहाय्यकाच्या संगनमतानेच सुरु होता गोरखधंदा
The गडविश्व
गडचिरोली / सिरोंचा, २५ जून : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने या वनात उत्कृष्ट सागवान उपलब्ध आहे. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रात एकाचवेळी १९ फर्निचर दुकानांवर धाड टाकून वनविभागाने झाडाझडती घेतली असता तब्बल ९ दुकानांमध्ये सुमारे साडेसात लाखांचे दुर्मिळ व मौल्यवान सागवान अवैधरीत्या  आढळून आल्याने जप्त करण्यात आले. हा गोरखधंदा क्षेत्रसहाय्यकाच्या संगनमतानेच सुरु असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीत समोर आल्याने तडकाफडकी क्षेत्र  सहायक कादीर शेखला निलंबित करण्यात आल्याचेही कळते. तर याप्रकारणी फर्निचर दुकानदारांवर गुन्हा दाखल करून सर्व दुकानदारांचा फर्निचरमार्टचा परवाना २३ जून रोजीपासून कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. सदर कारवाईने फर्निचर दुकानदार तसेच वनविभागात खळबळ उडाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा कंबलपेठा या गावांत १९ फर्निचर दुकाने असून वनविभागातील वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करुन २३ जून रोजी एकाचवेळी छापे टाकले असता ८ दुकानांमध्ये दुर्मिळ सागवान लाकडे व  फर्निचर तयार करण्यासाठी कापून ठेवलेल्या फळ्या असा लाखोंचा मुद्देमाल आढळून आल्याने सदर मुद्देमाल आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट झाल्यावर दुकानदारांची कसून चौकशी केली. दरम्यान हि सागवान तस्करी क्षेत्रसहाय्यक कादीर शेख याच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचे उघड झाल्याने उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी पी.डी.बुधनवर,  वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.झाडे यांनी कारवाई करत क्षेत्र  सहायक कादीर शेखला तडकाफडकी निलंबित केले. तसेच याप्रकरणी जय श्रीराम फर्निचर मार्ट, आसरअल्ली ( रविंद्र मिनाबाबू कासोजी ), महालक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( संतोष साबंय्या गोत्तुरी), लक्ष्मी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली (समय्या पोचालू गंप्पा), त्रिमुर्ती फर्नीचर मार्ट, जंगलपल्ली (देवेद्र लच्चन्ना गोत्तुरी), बालाजी फर्नीचर मार्ट, आसरअल्ली ( किशोर शंकर कोरटला), ओम श्री विराट फर्नीचर मार्ट जंगलपल्ली (राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी), गंगापुत्रा फर्नीचर मार्ट, आसरअल्ली (राजकुमार समय्या पोटे), भार्गवचारी फर्नीचर मार्ट, अंकिसा (सुरेश चंद्रय्या अरिंदा)  यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात करून त्यांच्याकडील एकूण ७ लाख ५१ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर या कारवाईत बेवारस ३४ हजार ३११ रुपयांचे सागवान देखील आढळून आल्याने एकूण ७ लाख ८५ हजार ९०५ रुपयांचा हा सर्व मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला व त्या फर्निचर दुकानदारांचा फर्निचरमार्टचा परवाना २३ जून पासून कायमस्वरुपी रद्द केल्याची माहिती उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दिली. सदर कारवाई मध्ये पी.डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी सिरोंचा, पी. बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बामणी व त्यांची चमु, एस.पी.बारसागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी झिंगानुर व त्यांची चमु, एन. टी. चौके, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रनिघ), पी.एम.पाझारे, वपअ फिरते पथक तसेच देचली परिक्षेत्रातील वनकर्मचारी असे एकुण 50 अधिकारी / कर्मचारी मिळून कारवाई केली. वरिल प्रकरणाची सखोल चौकशी पी. डी. बुधनवर, उपविभागीय वनअधिकारी, सिरोंचा यांचे मार्गदर्शनात पी.बी. झाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बामणी हे करित आहेत. वरिल कार्यवाहीच्या अनुषंगाने सिरोंचा वनविभागातील अवैध वृक्षतोड/ अवैधवाहतुक करण्यावर आळा बसेल अशी खात्री वर्तविल्या जात आहे.
(the gdv, the gadvishva, gadchiroli, sironcha, asaralli forest, gadchiroli forest)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here