आश्रम शाळेचे वेळापत्रक जुन्‍याप्रमाणे कायम ठेवा

185

– आमदार सुधाकर अडबाले यांची आदिवासी विकास मंत्री व आयुक्‍तांकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ९ जुलै : आदिवासी विभागाने आश्रम शाळांकरिता नवीन वेळापत्रक शासन निर्णय काढून लागू करण्यात येत आहे. हे वेळापत्रक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. त्‍यामुळे आश्रम शाळेच्या शालेय वेळापत्रकाची वेळ जुन्‍याप्रमाणेच कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी आदिवासी विकास विभाग आयुक्‍त व आदिवासी विकास मंत्र्यांकडे केली आहे.

सत्र २०२३ २०२४ पासून म्हणजे आता नवीन सत्रात आदिवासी विकास विभागाने नवीन वेळापत्रक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे. हे वेळापत्रक आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. नवीन वेळापत्रकानुसार दोन सत्रात शाळा भरणार आहे. यामध्ये सायंकाळी ६.३० वाजता विद्यार्थ्यांना जेवण मिळणार आहे. तर पुन्हा दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वाजता जेवण दिले जाईल. दोन जेवणातील १८ तासांचे अंतर आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना १८ तास उपाशी राहावे लागेल. सकाळी ७ ते सायंकाळी ६ असे १३ तासांचे शालेय सत्र आहे. सकाळी ५ वाजता विद्यार्थ्यांना जागे करून प्रार्थना व रात्री ९.३० पर्यंत हे निवासी वेळापत्रक राहणार आहे. त्यामध्ये प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना हे अवजड वेळापत्रक झेपेल का? असा प्रश्न आहे. हा आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
सदर बदलणारी वेळ ही विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीची असून शारीरिक, मानसिकदृष्ट्या हानी पोहोचविणारी आहे. बऱ्याचशा शाळेमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असून नियमित कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे सदर वेळापत्रकाची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. राज्‍यात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या व जिल्हा परिषदेसह ११ ते ५ शाळा आहेत. हीच वेळ अध्ययन व अध्यापनासाठी योग्य आहे. यामध्ये सकाळी १० वाजता जेवण, ११ वाजता शाळा, दुपारी मधल्या सुटीत नाश्ता व सायंकाळी ५ वाजता सुट्टी, असे नेहमीचे ११ ते ५ चे आदिवासी आश्रम शाळेचे जुनेच वेळापत्रक कायम ठेवावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी निवेदनाद्वारे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आदिवासी विकास विभाग आयुक्‍त, प्रधान सचिव यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here