The गडविश्व
गडचिरोली, १० जुलै : अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश घेतला आहे. पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच चांदेकर भवन येथे संपन्न झाली त्यावेळी हा पक्षप्रवेश जाहीर करण्यात आला.
पक्ष प्रवेश करणाऱ्यात सेवानिवृत्त वनपाल सुदेश झाडे, घनश्याम जकुलवार, शिवनगर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते उमेश ढोक, डॉ. मनोज अलाम, पोर्ला येथील कार्यकर्ते रोशन करंडे, नवरगाव येथील अरुण भैसारे, महिला कार्यकर्त्या कविता ढोक व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पक्षात प्रवेश करणार्या या सर्व कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, जिल्हा सल्लागार डॉ. हरिदास नंदेश्वर, प्रदेश सचिव केशवराव ससामृतवार, गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे या मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या अनुभवी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पक्ष अधिक बळकट होईल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आपणाला अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे ध्येयधोरण व गोरगरीब लोकांसाठी काम करण्याची तळमळ आवडल्याने आपण या पक्षात प्रवेश करीत असल्याचे नवोदित कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले व पक्षाच्या चळवळीसाठी आपण पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले.
या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे गडचिरोली शहर अध्यक्ष अनिल बारसागडे, युवा आघाडी अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, जिल्हा संघटक हेमचंद्र सहारे, जिल्हा उपाध्यक्ष तैलेश बांबोळे, विशालशिंग परीहार, तालुका उपाध्यक्ष विजय देवताळे, चंद्रभान राऊत, दादाजी धाकडे, हेमाजी सहारे, नरेंद्र उंदीरवाडे, नीलकंठ भैसारे, गीता कोडाप, ललिता हर्षे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.