– आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षक हिताच्या मागण्यांबाबत केली चर्चा
The गडविश्व
गडचिरोली, २१ जुलै : शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने आज विदर्भस्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील मागण्यांबाबत आमदार सुधाकर अडबाले यांनी आज विधानभवनात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्याबाबत काढलेले परिपत्रक रद्द करून सुशिक्षीत बेरोजगारांची नियुक्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व्ही.यु. डायगव्हाणे, अध्यक्ष श्रावण बरडे यांच्या नेतृत्वात धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात आले.
राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअतर्गत संचालित प्राथमिक/ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा खाजगी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. या प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता नागपूर व अमरावती शिक्षण उपसंचालक यांचे कार्यालयासमोर तसेच विदर्भातील सर्व शिक्षणाधिकारी (माध्य.) यांचे कार्यालयासमोर आज, २१ जुलै २०२३ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान धरणे/ निदर्शने आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, आदिवासी विकास मंत्री व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांना शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
पावसाळी अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षक हिताचे प्रश्न लावून धरत विविध विषयांवर मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतले. आज संपूर्ण विदर्भात विमाशि संघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जिल्हास्तरावर विमाशि पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तर विधानभवनात आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन या शिक्षक हिताच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याची जाणीव करून दिली. त्या लवकरात लवकर निकाली काढा, असे सांगितले व आंदोलनातील मागण्यांबाबत निवेदन सादर केले. यावेळी अमोल डोंगे उपस्थित होते.