शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ॲमेझॉनची तंत्रज्ञानाच्या सहकार्याची तयारी : शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

228

The गडविश्व
मुंबई : राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम यासंदर्भात पूरक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य करण्याबाबत ॲमेझॉनने तयारी दर्शविली असून त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून झाल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
राज्यात शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून तांत्रिक सहकार्यासाठी ॲमेझॉनने सहकार्य करण्यास तयारी दर्शविली आहे. यासंबंधी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रोहित पवार, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, ॲमेझॉन इंडियाचे संचालक सलीम मेमन, ॲमेझॉन सीएसआरच्या प्रमुख मनिषा पाटील, फ्युचर इंजिनिअरचे प्रमुख अक्षय कश्यप, पब्लिक रिलेशन्स टीमच्या माधवी कोचर, लीडरशीप फॉर इक्व‍िटीचे मधुकर बानुरी, पब्लिक पॉलिसीच्या स्मृती मिश्रा यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शिक्षणात तंत्रज्ञानाची मदत होण्यासाठी ॲमेझॉन सहकार्य करणार आहे. याअंतर्गत राज्यात 488 आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण, संगणकशास्त्रातील कोडिंग लॅब, ॲमेझॉनमार्फत देण्यात येणाऱ्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींचा समावेश करण्याची तयारी, सर्व शासकीय शाळांमधील शिक्षकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, पुणे येथे सायन्स सिटीच्या उभारणीमध्ये तंत्रज्ञानाची मदत, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 2022 पासून तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत करणे, प्रशिक्षण देणे या कामी ॲमेझानचे सहकार्य लाभणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत वर्ग डिजिटाईज्ड केले जाणार आहेत. यामध्ये देखील ॲमेझॉनच्या सहकार्याची सुरूवात म्हणून मुंबईच्या धारावीमधील महानगरपालिकेअंतर्गत शाळांमधील 769 विद्यार्थ्यांना टॅब दिले जाणार असून नियमित अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा उपयोग करता येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हिंदी माध्यमिक शाळा (संत कक्कया शाळा इमारत) दादर, काळा किल्ला मराठी प्राथमिक शाळा, काळा किल्ला एमपीएस माध्यमिक, टी.सी.मनपा मराठी माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा उर्दू माध्यमिक शाळा, टी.सी.मनपा इंग्रजी माध्यमिक या शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात टॅबचे वितरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here