प्रधानमंत्री पीक विमा योजना : तीन दिवसांची मिळाली मुदतवाढ

823

The गडविश्व
गडचिरोली, ३१ जुलै : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षासाठी राबविण्यास मान्यता देण्यात आलेली होती. तथापी, केंद्र शासनाच्या सुचनेनुसार Cup & Cap Model (८० : ११०) नुसार सदर योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२५-२६ हंगामासाठी या तीन वर्षाकरिता अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणुन ३ वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.
योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत खरीप हंगाम-२०२३ करीता दिनांक – ३१ जुलै २०२३ अशी होती. परंतु ती वाढून आता ३ ऑगस्ट करण्यात आलेली आहे. सन २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणेसाठी शेतक-यांना प्रति अर्ज केवळ १/- रुपया भरून पिक विमा पोर्टलवर नोंदणी करावयाची आहे.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा-

खरीप हंगाम २०२३ करीता सदर योजना नमुद केलेल्या विमा कंपनी कडून सबंधित जिल्ह्यामध्ये राबविण्यात येईल.
जिल्हा-गडचिरोली, विमा कंपनी- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि., टोल फ्री क्रमांक- १८००१०२४०८८ असा आहे. या योजनेंतर्गत खालील जोखीम बाबींचा खरीप २०२३ करीता समावेश करण्यात आला आहे.

१. हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान : खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेत्रात व्यापक प्रमाणात पेरणी/लावणी होऊ न शकलेल्या क्षेत्रासाठी पेरणी/लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.

२. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान : सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबीमुळे शेतक-यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट आली असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील.

३. पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट : दुष्काळ,पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे,किड व रोगांचा व्यापक प्रादुर्भाव,भूस्खलन,नैसर्गिक आग,विज कोसळणे,वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणा-या उत्पादनातील घटीपासुन व्यापक विमा संरक्षण दिले जाते.

४. स्थानिक नैसर्गिक आपत्ती : या बाबी अंतर्गत गारपीट,भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा विज कोसळल्यामुळे लागणारी आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास होणारे अधिसुचित पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.

५. काढणीपश्चात नुकसान :- ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पिक कापणी करून पसरवून अथवा पेंढ्या बांधुन सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी /काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे काढणीनंतर २ आठवड्याच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस, आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

काढणीपश्चात नुकसान व स्थानिक आपत्ती या जोखिमेंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतक-यांनी सर्व्हे नंबर नुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीबाबतची सुचना सबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक/ बँक/ कृषि व महसुल विभाग यांना कळविण्यात यावे. सर्वप्रथम पीक विमा अॅपचा वापर करण्यात यावा. तसेच नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक असेल.

विमा संरक्षित रक्कम :

खरीप २०२३ करीता पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे.
गडचिरोली जिल्हा- सोयाबीन-45000, कापूस- 50000, भात (तांदुळ)-45000.

• बिगर कर्जदार शेतक-यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजीकचे बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रासह विमा प्रस्ताव सादर करावा.
• कर्जदार शेतक-यांना योजनेत सहभागी होण्याचा/ न होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकरी योजनेत सहभाग नोंदविण्यास इच्छुक नसेल तर तसे घोषणापत्र योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदरपर्यंत देणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस अगोदर शेतक-यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतक-यांना पुढील हंगामाकरिता योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल.
• विमा योजनेमध्ये विविध जोखिमीअंतर्गत निश्चित होणारे नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेच्या अटी व शर्तीच्या अधिन राहुन निश्चित केले जाते. हंगामात घेण्यात आलेल्या पिक कापणी प्रयोगातुन प्राप्त होणा-या सरासरी उत्पन्नाची तुलना ही उंबरठा उत्पन्नाशी करून हंगामाच्या शेवटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.
• या योजनेत सहभागी होण्याकरिता ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी.विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई-पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल.

तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होण्याकरिता आपल्या नजीकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहित मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केलेले असुन या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ब.भि.मास्तोळी यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here