– निर्लेखीत करून नव्याने बांधकाम करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ११ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी गाव लोकसंख्येने बर्यापैकी मोठे असून गावात मागील ३५ ते ४० वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात असून नागरिकांच्या सेवेत तत्परतेने कार्यरत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास प्राथमिक आरोग्य केंद्र भाकरोंडी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अमिर्झा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक सेवेचा लाभ घेतात. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही ४० वर्षे जुनी असल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण इमारतीला ओलावा पकडत असल्याने स्लॅबचे जुने प्लास्टर मधून मधून खाली पडते, साखळी दिसतात, इमारतीच्या संपूर्ण भिंतीला तडा गेलेल्या आहेत. संपूर्ण इमारतीला ओलावा असल्यामुळे अधिकारी कर्मचारी तसेच भरती असलेल्या गरोदर माता व रुग्णांना करंट लागण्याचा धोका निर्माण होत आहे. संपूर्ण इमारती सध्या स्थिती अतिशय धोकादायक झालेली असून भविष्यात एखाद्या रुग्णांचा किंवा कर्मचारी यांचा धोकादायक इमारतीमुळे अपघात होऊन मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही इमारत पूर्णतः निर्लेखित करून नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यात यावे परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
दुरुस्ती केलेली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातील अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान पावसाळ्यात गळत असून भिंतीला ओलावा येत असतो. त्यामुळे विजेचा करंट लागून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही करीता आपले स्तरावरून निवासस्थानाची दुरुस्ती करून देण्यात यावी. दरवर्षि दुरुस्ती केल्यानंतर ह्या इमारती गळतात कशा ?असा देखील सवाल उपस्थित होता असून अशा विविध मागण्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना करण्यात आली आहे .