गडचिरोली येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुढील वर्षी सुरु होणार

471

– वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया वेगात
The गडविश्व
गडचिरोली, १३ ऑगस्ट : गडचिरोली जिल्हा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसह गुणवत्तायुक्त आरोग्य सेवा प्रदान करण्याकरीता सज्ज होणार आहे. 11.07.2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत घोषणा केलेली होती व 14.07.2023 रोजी या बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील उपक्रम सुरु असुन प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यामुळे डॉक्टरांच्या नवीन पिढीला दर्जेदार शिक्षण व प्रशिक्षण मिळून आरोग्य सेवांच्या गरजा पूर्ण होतील.
गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आगामी वैद्यकीय महाविद्यालयाबाबत उत्साह व्यक्त केलेला असुन हा प्रयत्न स्थानिक जनतेसाठी आरोग्य सेवा सुलभता आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधीला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या कमी असली तरी हा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या अवघड व नक्षलग्रस्त आहे. येथील काही भाग वनव्याप्त असुन काही भाग डोंगराळ व नद्यांनी वेढलेला आहे. तथापि, लगतच्या काही जिल्ह्यांचे व राज्यांचे लोक आरोग्य सुविधांकरीता येथेचे धाव घेत असतात. अत्याधुनिक उपचाराकरीता दुसऱ्या जिल्ह्यांत जाण्याची तयारी नसते. अशा या गोर-गरीब जनतेला महागडे उपचार परवडणारे नसतात. यामुळे ते चांगल्या आरोग्य सुविधांपासून वंचित राहतात. आजाराने जीर्ण होऊन प्रसंगी त्यांचा मृत्यूही होतो. वैद्यकीय महाविद्यालयामुळे अशा अनेकांचे प्राण वाचणार आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरीता आवश्यक जागेकरीता प्रक्रीया पूर्ण झालेली असुन सध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय यांच्या उपलब्ध जागेसह लागणारी अतिरिक्त जागा अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. आवश्यक मनुष्यबळ, इमारत बांधकाम, यंत्रसामुग्री इत्यादिंवर होणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्र देखील तयार झालेले असुन ते लवकरच शासनास सादर केल्या जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथील प्राध्यापक डॉ. अविनाश टेकाडे यांना शासनातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली येथील अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला असुन नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरीता आवश्यक पाठपुरावा ते करीत आहेत. गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतिशकुमार सोळंके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली असून सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग या दोहोंत समन्वयन साधन्याचे काम त्यांना सुपूर्द करण्यात आलेले आहे.

संजय मीणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली – गरीब व गरजू जनतेला अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधा याच जिल्ह्यात उपलब्ध करुन देण्यात व पर्यायाने त्यांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावण्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हातभार लावेल.

डॉ. अविनाश टेकाडे, अधिष्ठाता (प्र.), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या १०० विद्यार्थ्यांना समावून घेण्याच्या क्षमतेसह प्रस्तावित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली सारख्या आदिवासी-बहुल व नक्षलग्रस्त जिल्ह्यास निश्चितच वरदान ठरणार आहे.

डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली – या जिल्ह्यातील आरोग्य कल्याणासाठी हा उपक्रम मोलाचे योगदान देणारा असा ठरणार आहे. लोकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे देण्याच्या शासनाच्या वचनबध्दतेचे हे प्रतिक होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here