– कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ ऑगस्ट : या वर्षी जोरदार पडलेल्या एकाच पाण्यामुळे रस्ता वाहून गेल्याने निमगाव ते बोरी मार्ग बंद पडला असुन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करा अशी मागणी परिसरातील लोकांकडून होत आहे.
निमगाव ते बोरी मार्गावर तलावाच्या मध्यभागी रस्त्यावर भला मोठा खड्डा पडलेला आहे. यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे पाणी वाहून जाण्याकरिता पुलाची गरज असतानाही येथे पुलाचचे बांधकाम केले नाही तसेच सिमेंटचे पाईप टाकले नसल्याने रस्ता वाहुन गेल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. चारचाकी वाहतुकीस सदर मार्ग धोकादायक ठरलेले आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे दुचाकी चारचाकी वाहनचालक जीव मुठीत धरून मार्ग पार करावा लागतो आहे. या रस्त्यावर प्रवाशांची ये-जा असते, विद्यार्थी शेतकरी शेतमजूर दररोज येजा करतात, दुचाकीस्वारांना या मार्गावर प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
धानोरा तालुक्यातील निमगाव येथून पाचशे मीटर अंतरावर बोरी मार्गावर गावाला लागूनच तलाव आहे. जंगलातून येणारे पाणी तलावात खालच्या भागात उतरते परंतु पाणी जाण्याकरता मोरे बांधकाम किंवा पाईप टाकने आवश्यक होते मात्र तसे केले नाही. जिथे गरज आहे नेमके तिथेच मोरी बांधकाम न केल्याने पाण्याच्या प्रवाहाने रस्त्यावरील गिट्टी आणि डांबर पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने रस्ताच वाहून गेला. या रस्त्यावर मोठा भगदाड पडल्याने या मार्गावरची रहदारी बंद पडली आहे. सदर खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवित हानी होऊन वाहनाचे मोठे नुकसान होऊ शकते. अतिवृष्टीच्या पाण्याने मूळ रस्ताच वाहून गेल्याने सध्या तरी हा रस्ता निकामी झालेला आहे. पावसाने रस्त्याची क्षमता अधिकच खालावली गेली आहे. रस्त्याची अवस्था बघितली असता रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे बाहेर पडले असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यावर वाहतूक किंवा प्रवास करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खोलवर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे त्यामुळे प्रशासनाने मोठा अपघात टाळण्यासाठी वेळीच कारवाई करून रस्ता सुरळीत करावा किंवा कायमस्वरूपी मोरी बांधकाम करावे. लोकप्रतिनिधींनी या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन रस्ता वेळी दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.