The गडविश्व
गडचिरोली, १९ ऑगस्ट : जिल्ह्यात दारूबंदी आहे मात्र छुप्या मार्गाने दारूची विक्री होते. आरमोरी तालुक्यातील डोंगरसावंगी ग्रामपंचायत कार्यालयात सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करून अवैध दारू व तंबाखूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. तसेच नियमाचे उल्लंघन करून अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून दंड वसूल करण्याचेही ठरविण्यात आले. विशेष म्हणजे, या सभेला मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी उपस्थिती लावली होती.
काही दिवसांपूर्वी डोंगरसावंगी येथे महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुक्तिपथ गाव संघटनेची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. बैठकीत अवैध दारू व तंबाखू बंदीचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत व गाव संघटनेमार्फत नोटीस जाहीर करण्यात आले. सोबतच अहिंसक कृती करीत अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांची ३ हजार ९०० रुपयांची मोहफुलाची व देशी दारू पकडून नष्ट करण्यात आली. यावेळी गावातील ७० महिला, पुरुष, ग्राम समिती उपस्थित होती. त्यानंतर १७ ऑगस्ट ला सर्वसाधारण ग्रामसभा आयोजित करून गाव संघटना डोंगरसावंगी यांनी अवैध दारू विक्री व तंबाखू विक्री बंद करण्यात यावी. तसेच विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी असा ठराव बहुमताने पारित करून पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी मुक्तिपथचे उपसंचालक संतोष सावळकर, तालुका संघटक विनोद कोहपरे, स्वीटी आकरे उपस्थित होते.