चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळणार वैमानिक बनण्याची संधी

130

– मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे चंद्रपूर फ्लाईंग क्लब निर्मिती साठी वेगाने कार्यवाही करण्याचे निर्देश
The गडविश्व
मुंबई/चंद्रपूर, ९ सप्टेंबर : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे या जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती – जमाती, इतर मागास वर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येथील फ्लाईंग क्लब लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
मंत्रालयात आज बुधवारी मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जिल्हाधिकारी विनय गौडा, सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्री सुमंत भांगे, भाजपा जिल्हा अध्यक्ष हरीश शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय, दूरदृष्यप्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, एमएआयडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती स्वाती पांडे उपस्थित होत्या.
मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्यात फ्लाईंग क्लब झाल्याने येथील वैमानिक बनू इच्छिणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व रीतसर परवानगी घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान ३ शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. याशिवाय, सीएसआर फंडातून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चंद्रपूर विमानतळाचा वापर सध्या बंद आहे. त्यामुळे येथे फ्लाइंग क्लब सुरू केल्यामुळे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना नियमानुसार जे २०० तासांचे प्रशिक्षण देणे आवश्यक असते, ते येथे देता येईल. विमानतळावरील सर्व आवश्यक सुविधांची पूर्तता विमानतळ प्राधिकरणाने कराव्यात. यासाठीचा सेवा रस्ता आणि इतर अनुषंगिक कामे राज्य शासन करेल, असेही मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here