The गडविश्व
गडचिरोली, ११ सप्टेंबर : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आरमोरी तालुका युनिटची बैठक नुकतीच शासकीय अतिथीगृह, आरमोरी येथे पार पडली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते तर केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशराव सम्रुतवार, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, राजकुमार देशपांडे, महिला आघाडीच्या वंदना भैसारे, रमाबाई गजभिये, पुष्पा रामटेके, महादेव बांबोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला आदींच्या विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आणि या समस्या शासनाकडे मांडण्यासाठी लवकरच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनात्मक बाबींवरही चर्चा केली आणि रिपब्लिकन चळवळीचा इतिहास आणि कार्य तसेच पक्षाची धोरणे व कार्यक्रम सांगून जास्तीत जास्त लोकांना पक्षात सामावून घेण्यासाठी पक्षाच्या गावपातळीवर शाखा उघडण्याचा संकल्प केला.