– उपचारात हयगय केल्याचा नातेवाईकांचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, २८ सप्टेंबर : जिल्हा मुख्यालयातील महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीनंतर दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून मृतकांच्या नातेवाईकांनी उपचारात हयगय केल्याचा आरोप केला आहे. रजनी प्रकाश शेडमाके (२३) रा.भानसी ता.सावली जि.चंद्रपूर व उज्ज्वला नरेश बुरे (२२) रा.मुरखळा चक ता.चामोर्शी (हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली) अशी मृत महिलांची नावे आहेत.
२४ सप्टेंबरला या दोघींना प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालयात भरती करण्यात आले होते. दरम्यान तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी दोघींचीही शस्त्रक्रियेद्वारे ( ‘सिझेरियन’ ) प्रसूती करण्यात आली. रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला तर उज्ज्वला बुरे हिला ताप आणि अतिसाराची लागण झाल्याने त्यांना २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान संध्याकाळी रजली शेडमाके हिचा मृत्यू झाला तर उज्ज्वला बुरे हिला नागपूरला रेफर करताना मार्गातच रात्रौ ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ तिने प्राण सोडले. दोघांचाही मृत्यू झाला असला तरी दोघींचेही बाळ सुखरुप आहेत अशी माहिती आहे. डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्यामुळे दोघींना प्राण गमवावे लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे.
सदर प्रकरणाबाबत चौकशी समिती कडून तपास सुरू असून समितीचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळणार आहे.