गडचिरोली : ३ ऑक्टोबर ला शेतकरी विरोधी भाजप सरकार विरोधात निदर्शने

162

– मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २९ सप्टेंबर : भाजप सरकारने केलेले तीन केंद्रीय काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना आणि एक पत्रकाराला लखीमपूर खिरी येथे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलांने चिरडून मारले होते. या घटनेनंतर त्याला शिक्षा होणे आणि अजय मिश्राला राज्यमंत्री पदावरून दूर करायचे सोडून त्यांना पाठीशी घालण्याचे काम मोदी सरकारने केलेले असल्याने या घटनेच्या निषेधार्थ ३ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील गांधी चौकात दुपारी १२ वाजता निदर्शने आयोजित करण्यात आले असून या निदर्शनांना भाजप विरोधी राजकीय पक्ष व संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले आहे.
देशभरातील भाजप विरोधी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन देशात ३ ऑक्टोबर हा काळा दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केले असल्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत गडचिरोलीतील गांधी चौकात भाजप सरकार विरोधात यानिमित्ताने सर्व पक्ष आणि संघटनांनी एकत्र येवून निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ.डाॅ.महेश कोपूलवार, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, युवक जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, किसान काॅग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, प्रतिक डांगे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार प्रामुख्याने उपस्थित होते.
शेतकरी विरोधी काळ्या दिनानिमित्त गांधी चौकात होणाऱ्या निदर्शनांना केंद्रातील भाजपच्या मोदी सरकार विरोधी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी, आम आदमी पक्ष, आदिवासी विकास युवा परिषद, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here