– बालपणातील आजारांची होणार तपासणी
The गडविश्व
गडचिरोली,०४ ऑक्टोबर : जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील जन्मजात बालके/विद्यार्थी यांच्यामध्ये जन्मता असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक विलंब, वाढीतील दोष तसेच इतर बालपणातील आजारांची तपासणी, निदान निश्चिती, थेरपी व उपचार आपल्या जिल्ह्यामध्येच उपलब्ध असावे, यासाठी जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील पेडीऑट्रीक विभाग सुरू करण्यात आले आहे.
या फिजिओथेरपी युनिटचे उद्घाटन दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ धुर्वे आदी उपस्थित होते.
डीईआयसी येथील उपलब्ध जागेमध्ये ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ बनविण्यात आले असून बालकांसाठी आकर्षित रंगरंगोटी अंतर्गत सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्यांना खेळीमेळीचा सहवास लाभावा तसेच बालकांची मानसिक आरोग्यस्थिती व्यवस्थित व्हावी व थेरेपी करिता अनुकूल वातावरण मिळावे, हा यामागील हेतू आहे. फिजिओथेरेपीकरिता येथे बालकांच्या विकासात्मक वाढीसाठी आवश्यक वेगवेगळे साहित्य/उपकरणे उपलब्ध करण्यात आले आहे.
नियमित फिजिओथेरेपीमुळे बालकांमध्ये आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होऊ शकते. थेरेपी स्नायुमधील बदलांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते. जसे की स्नायू कडक होणे, स्नायूंची ताकद, लवचिकता, पोश्चर, गतिशीलता, दैनंदिन जीवनातील कार्यात्मक स्वातंत्र आणि एकूण जीवनाच्या गुणवत्तेत बदल होण्यास मदत मिळते. अनेकदा स्पेशल एज्युकेशन, स्पिच थेरेपी आणि आकुपेशनल थेरेपीचे एकत्रीकरण जीवन कौशल्यामध्ये प्रगती करते.
प्रत्यक्षात फिजिओथेरेपीचे कौशल्य अनेक आहेत, ते कोणत्याही स्थितीवर उपचार करू शकतात. ज्यामुळे हालचाल, संतुलन किंवा समन्वय, हाताची पकड, बसणे, खेळतांना हाताचा वापर, स्ट्रेचिंग व्यायाम, संतुलित व्यायाम तसेच सामाजिक परस्पर संवादाच्या संधी, आर्थोपेडिक किंवा क्रीडा दुखापतीचे वैद्यकीयदृष्ट्या निदान ई समाविष्ट आहेत. तसेच बाळ उशिरा चालणे, उशिरा मान धरणे, वेळेत न रांगणे, हाता-पायाची कमी हालचाल, बाळाला उभे राहण्यास अडचण, सरळ चालण्यास अडचण ई गोष्टी बालकाच्या वयानुरुप नसल्यास बालरोग फिजिओथेरेपीची आवश्यकता आहे.
यासाठी नागपूर येथील ज्येष्ठ बालरोग फिजिओथेरेपीस्ट तथा पुनर्वसन सल्लागार डॉ. मिनाक्षी वानखेडे इतर थेरेपिस्टसह दर महिन्याच्या पहिल्या व तिस-या आठवड्यातील शुक्रवारला पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट, डीईआयसी येथे उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान बालकांची तपासणी, मुल्यांकन, गरजेनुसार थेरेपिचे नियोजन, थेरेपीमधील अल्प-दीर्घ उदिष्टे ठरविणे व बरेच काही बाबींचा नियोजन आहे. तसेच दर सोमवार-मंगळवार-बुधवार प्रशिक्षित थेरेपीस्टकडून नियमित फिजिओथेरेपी सत्रे असणार आहेत.
सांधे घट्ट होणे, चालायला उशीर, मोटर विलंब (ग्रास आणि फाईन), आकलनाच्या समस्या, स्नायू कमकुवत होणे, डीले माईलस्टोन, मेंदूचा पक्षाघात, डाऊनसिंड्रोम, अतिचंचलता (एडीएचडी), स्वमग्न (ऑटीझम), आर्थोसमस्या, वाढीतील दोष, विकासात्मक विलंब व इतर शारीरिक समस्या असलेल्या बालकांना ‘पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट’ साठी संदर्भित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.