गडचिरोली येथे वन्यजीव सप्ताह निमित्त अभिनव उपक्रम

235

– “टेरिटरी” मराठी चित्रपट दाखवून वनविभागाच्या कार्यावर टाकला प्रकाश
The गडविश्व
गडचिरोली, ७ ऑक्टोबर : वनविभागाद्वारे १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वन्यजीवाचे महत्व जनमानसात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनात लोकांचा सहभाग करवून विविध उपक्रम राबवले जातात, तसाच एक स्तुत्य उपक्रम गडचिरोली वनपरिक्षेत्र, गडचिरोली वनविभागा मार्फत राबवून “टेरिटरी” हा मराठी चित्रपट टीपागड सभागृहात ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित केला गेला. सदर चित्रपटाच्या निमित्ताने मानव- वन्यजीवाच्या संघर्षात वनविभागाला येणाऱ्या अडचणीवर मात करून कशाप्रकारे वनविभागाचे कर्मचारी काम करतात यावर प्रकाश टाकला गेला.सदर चित्रपट यानंतर प्रोजेक्टर च्या साह्याने विविध गावांमध्ये दाखविण्यात येणार असल्याचे मिलीश दत्त शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली, यांनी सांगितले. सदर चित्रपट वनविभागात दाखविण्याकरता चित्रपटाचे दिग्दर्शक तथा निर्माते सचिन मूल्यमवार यांच्याशी संपर्क करून चित्रपटाची डिजिटल प्रत प्राप्त करून घेण्याकरिता करिष्मा कावळे सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांनी विशेष प्रयत्न केले. टिपागड सभागृहात “टेरिटरी” हा चित्रपट प्रदर्शित करीत असताना सदर चित्रपटात भूमिका साकारणारे व चंद्रपूर गडचिरोलीतील झाडीपट्टीचे कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेले भरत रंगारी व सुनेना खोब्रागडे हे मंचावर उपस्थित होते.सुनेना खोब्रागडे ह्या गडचिरोली तालुक्यातील साखरा या गावातील रहिवासी असून चित्रपटसृष्टीपर्यंत त्यांची मजल ही गडचिरोली जिल्ह्यासाठी कौतुकास्पद आहे.
चित्रपट प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिलिश दत्त शर्मा उपवनसंरक्षक गडचिरोली यांनी भूषविले तर प्रमुख पाहुण्यांचे स्थान पवन जोंग परिविक्षाधीन उपवनसंरक्षक, चित्रपट कलाकार भरत रंगारी व सुनैना खोब्रागडे तसेच गणेश पाटोळे विभागीय वनाधिकारी दक्षता, यांनी भूषविले. कार्यक्रमाची प्रस्तावना धम्मराव दुर्गमवार वनरक्षक, सूत्रसंचालन सुनील पेंदोरकर क्षेत्र सहाय्यक व आभार कु. तातावर वनरक्षक यांनी मानले.
चित्रपट प्रदर्शनासाठी करिष्मा कावडे सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे नियोजन उपवनसंरक्षक गडचिरोली यांचे मार्गदर्शनात अरविंद पेंदाम वनपरिक्षेत्र अधिकारी गडचिरोली यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here