The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ ऑक्टोबर : बालविवाह हा केवळ मानवी अधिकाराचा विषय नसून स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जबरीने हिसकावून अल्पवयीन मुलींचे गैरकायदेशीर पण समाजातील भ्रामक समजुतीमुळे लैंगिक शोषण करण्याची अमानवीय पद्धत आहे. स्पर्श या संस्थेने गडचिरोली जिल्ह्यात बालविवाहाविरुद्ध उभे केलेले आंदोलन स्पृहणीय असून स्पर्श संस्थेच्या मदतीने गडचिरोली जिल्ह्याला बालविवाह मुक्त करणार असे प्रतिपादन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी केले. ते स्पर्श संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते.
येथील विद्याभारती कन्या हायस्कूल येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक हितवादचे पत्रकार रोहिदास राऊत, जिल्हा सत्र न्यायालयाचे ज्येष्ठ अधिवक्ता ॲड. संजय भट, स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप बारसागडे, गडचिरोली पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक माधुरी मिसाळ, विशाखा मैत्रे, आरती सासवडे, चांदाळा येथील माया खोब्रागडे, विद्याभारती कन्या विद्यालयाच्या प्राचार्या वंदना मुनघाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून गडचिरोली जिल्ह्यात बालविवाह मुक्तीसाठी ‘एक्सेस टू जस्टीस फॉर चिल्ड्रेन’ या प्रकल्प अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पत्रकार रोहिदास राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलीनी न्यूनगंडातून बाहेर पडावे आणि भारत देशाला असलेल्या यशस्वी महिलांच्या परंपरेतून आपल्या अंगी आत्मविश्वास बाळगावा असे सांगितले. ॲड. संजय भट यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाचे महत्व विशद करून बालकांसाठी असलेल्या विविध कायद्याची माहिती दिली. माधुरी मिसाळ यांनी मुलीनी आपल्या बाह्य सौंदर्याकडे अधिक लक्ष देण्यापेक्षा जे चिरंतन टिकते त्या अंतर्गत सौंदर्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन फाऊनडेशन चे सल्लागार भुवन रीभू यांनी लिहिलेल्या “व्हेन चिल्ड्रेन ह्याव चिल्ड्रेन” या बालविवाहमुक्त भारत बनविण्याची ब्लू प्रिंट असलेल्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. यावेळी माया खोब्रागडे यांनी आपले लग्न वयाच्या तेराव्या वर्षी झाले आणि अल्पवयात लग्न झाल्याने प्रचंड शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले असे सांगून बालविवाह हि अनिष्ठ प्रथा आहे. ती आता संपलीच पाहिजे असे खंबीर मत मांडले. वंदना मुनघाटे यांनी यावेळी बालविवाह थांबविण्यासाठी समाजात जाणीवजागृती करण्याची गरज स्पष्ट केली. यावेळी माया खोब्रागडे यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी घेतलेल्या पुढाकाराकरिता त्यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थितांना बालविवाह रोखण्याबाबत शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन लुकेश सोमनकर यांनी तर आभार सायली मेश्राम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी वैभव सोनटक्के, लीना बाळेकरमकर, तेजस्विनी हेमके, प्रेरणा उराडे, वर्षा दुर्गे यांनी सहकार्य केले.