The गडविश्व
ता.प्र / धानोरा,१७ ऑक्टोबर : गडचिरोली येथील स्पर्श संस्था आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत बालविवाह मुक्त गडचिरोलीचे निर्माण करण्यासाठी काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीला जिल्हाभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गडचिरोली शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी या रॅलीत सक्रीय सहभाग घेऊन बालविवाह प्रतिबंधासाठी शपथ घेतली.
सकाळी ८:३० वाजता स्थानिक इंदिरा गांधी चौक येथून निघालेल्या या रॅलीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरवात केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, शिक्षण विस्तार अधिकारी अमरसिंघ गेडाम, दैनिक सकाळ चे जिल्हा प्रतीनिधी मिलिंद उमरे, जिल्हा बाल कल्याण समितीचे सदस्य दिनेश बोरकुटे, ग्राहक मंचाच्या सदस्या रोझा खोब्रागडे, प्राचार्य चंद्रगिरवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
रॅलीच्या सुरवातीला स्पर्श चे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक डॉ.दिलीप बारसागडे यांनी प्रास्ताविकातून बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीचे महत्व सांगताना भारतातील बालविवाहाची गंभीरता स्पष्ट केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आणि यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांनी या निमित्त बालविवाह मुक्त गडचिरोली जिल्हा निर्माण करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांच्या सक्रीय सहभागाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लुकेश सोमनकर, वैभव सोनटक्के, लीना बाळेकरमकर, आस्था बारसागडे, सायली मेश्राम, जयंत जथाडे, प्रियंका आसूटकर, रवींद्र बंडावार, निलेश देशमुख, पूजा झमाले, अविनाश राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.