आरमोरी : शेतात काम करत असतांना वाघाचा हल्ला, महिला ठार

1988

– परिसरात वाघाची दशहत आणि नागरिकांची पळापळ
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे), १९ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्हयात वाघ, हत्ती व इतर वन्यप्राण्यांच्या धुमाकुळीने नागरिक त्रस्त झाले असून आता जिल्हयातील आरमोरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून भितीचे वातावरण आहे. ताराबाई एकनाथ धोडरे (६०) रा. काळागोटा (आरमोरी) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी परिसरात शेतीचे काम सुरू आहेत अशातच तालुक्यात वाघाचा वावर असल्याने वाघाच्या दहशतीत परिसरातील शेतकरी शेती करीत आहे. असे असतांना आरमोरी तालुका मुख्यालयापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या रामाळा गावातील शेतशिवारात काळागोटा येथील सात ते आठ महिला आज १९ ऑक्टोबर रोजी धान कापणी करताना वाघाने ताराबाई यांच्यावर हल्ला करत काही दूर फरफटत नेट नरडीचा घोट घेतला. सोबतच्या महिलांनी आरडाओरड केल्याने वाघ त्याठिकाणवरून पळून गेला मात्र यात ताराबाई यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी उसळली होती. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असता वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी उपस्थित नागरिकांनी वनविभागाप्रती तीव्र रोष व्यक्त करत काही मागण्या धरून रेटल्या. जोपर्यंत शेतीची कामे आहेत तोपर्यंत शेतशिवारात वीस ते पंचवीस वन मजूर गस्त घालत ठेवण्यात यावे. संबंधित क्षेत्रात कार्यरत वनरक्षक वनपाल यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, मृताच्या कुटुंबीयास तात्काळ ५० हजार रुपये मदत देण्यात यावी इत्यादी मागण्या करीत काहीकाळ घटनास्थळी आंदोलन सुरू केले.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांनी नागरिकांच्या लोकांच्या मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here