नक्षल्यांचे पत्रकाद्वारे मुख्यमंत्र्यावर आरोप : ‘हे’ आहेत कारण

1809
File Photo

– विरोधी पक्षाचीही टीकेची झोड
The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑक्टोबर : महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर असलेल्या मेडीगड्डा धरणावरील पुलाचे काही खांब खचल्याने मोठा वाद निर्माण झाला असतांना या वादात आता नक्षल्यांनी उडी घेत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांच्या कुटुंबियांवर पत्रकातून धरण बांधकामात मोठा घोटाळा केल्याचे आरोप केल्याची माहिती पुढे येत आहे.
२१ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास मेडीगड्डा धरणावरील पुलाच्या तीन खांबांना तडे गेल्याचे निदर्शनास आले होते. तेलंगणा सरकारने या मार्गावरील वाहतूक बंद केली. धरणातील पाणी सोडल्याने महराष्ट्रातील सिरोंचा तालुक्याला याचा फटका बसला. पाण्याचा अचानक झालेल्या विसर्गाने अनेकांची शेती बुडाली, जनावरे वाहून गेली. यामुळे धरणाच्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले आहे.
तेलंगणात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. असे असताना या वादात आता नक्षल्यांनी उडी घेतली. तेलुगु भाषेतून एक पत्रक काढून नक्षल्यांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांच्या कुटुंबियांवर धरण बांधकामात मोठा घोटाळा केल्याचे आरोप केल्याचे कळते. हे पत्रक समाजमाध्यमावर सार्वत्रिक झाल्याचेही कळते. आज या बांधकामाला तडे जात असल्याने घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात यामुळे होणाऱ्या नुकसानीला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव जबाबदार राहतील असेही पत्रकात नमूद आहे. नक्षल्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या कुटुंबीयांनी देखील या सिंचन प्रकल्पात मोठे कमिशन घेतल्याचेही म्हटले आहे.

(the gadvishva, the gdv, Gadchiroli News Updates, K C Rao, K chandrshekhar Rao, Telangana )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here