The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.२४ : ब्रह्मपुरी -आरमोरी-धानोरा मार्गाने ब्रम्हपुरी डेपोची बस शाळा सुरू होऊन पाच महिने उलटून गेले पण बस सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने हि बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी परिसरातील लोकांनी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
एस.टी.महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संप काळात धानोरा-आरमोरी -ब्रम्हपुरी बस बंद केल्या पासून आज पर्यंत हि बंद केलेली बस पुर्ववत करण्याची मागणी करण्यात येत आहे.
बंद करण्यात आलेल्या गाडीला वर्ष उलटले मात्र १२ महिन्याचा कालखंड उलटुनही बंद केलेली एस.टी महामंडळ ची सेवा सुरू करण्यात न आल्याने धानोरा, मोहली येथे शिक्षण घेण्यासाठी ये-जा करणाऱ्या मुला-मुलींना शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे.
रांगी परिसरातील नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना धानोरा, आरमोरी, ब्रम्हपुरी येथे ये -जा करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी हीच बस महत्त्वाची आहे. त्यामुळे सदर बस पूर्ववत सुरू करून विद्यार्थ्यांची व नागरिकांची होणारी गैरसोय थांबण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व नागरिकांनी केली आहे.
हि बस सकाळी ८.३० वाजता ब्रह्मपुरी येथून सुटायची व १०.०० वाजता रांगीला पोहचत असे. रांगीवरून या बसणे अनेक मुले-मुली मोहली, धानोरा येथे शालेय शिक्षण घेण्यासाठी जायचे, सर्व सामान्य लोक तालुक्यात विविध कामाकरिता जायचे. परत ४.०० वाजता ही बस रांगी ला पोहचायची. परंतु ही बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार मागणी करूनही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचे या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कमालीचा मनस्ताप त्रास सहन करावा लागत आहे. धानोरा,मोहली,चिंगलि,महावाडा,कन्हाळगाव,रांगी,कोरेगाव,विहिरगाव येथिल परिसरातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना, इतर प्रवाशांना या मार्गाने ये जा करण्यासाठी कोणतेही साधन नाही व प्रवासी वाहने चालत नसल्याने नागरिकांची मोठी फजिती होत आहे. गेल्या १२ महिन्यापासून ब्रह्मपुरी आगाराची एसटी बस सेवा बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ही बस ब्रह्मपुरी येथून सकाळी ८.३० वाजता सुटत होती. दिवसभराचे आपल्या नेहमीच दोन फेऱ्या करून सायंकाळी ब्रह्मपुरी आगारात पोहोचत होती. परंतु सध्या ही बस बंदच असल्याने नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे .त्यामुळे ही बस पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिक करित आहेत.