गडचिरोली जिल्ह्यातील बेकायदेशीर लोह खाणींमुळेच वन्यप्राण्यांचे हल्ले

242

– प्रसिद्धी पत्रकातून भाई रामदास जराते यांचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक नागरिकांवर वाघ आणि हत्ती यांचे हल्ले होवून जीव गमवावे लागले असून या परिस्थितीला जिल्ह्यात होत असलेल्या बेकायदेशीर लोह खाणी जबाबदार आहेत, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केला आहे.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथे वाघाने आणि मरेगाव येथील तरुणाला हत्तीने आपटून मारल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी पत्रक काढले असून त्यात म्हटले आहे की, संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा वाघ, बिबट, हत्ती, रानगवा यासारख्या शेड्युलमधील वन्यजीवांचे शेकडो वर्षांपासूनचे अधिवास होते. मात्र मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्हा आता गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खाणींसाठी जंगलतोड करण्यात आल्याने जंगलातील वन्यप्राण्यांचे पारंपारिक अधिवास नष्ट होत आले. त्यामुळे शहराजवळील क्षेत्रात वाघ, बिबट, हत्ती या वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. त्यातही शेतीकरीता प्रचंड प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली असल्याने प्राणी अधिक हिंस्त्र झाले असून माणसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. असेही भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करायचा असेल तर आधी बेकायदेशीर मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणी तातडीने रद्द करण्यात येवून वन्यजीव संवर्धन कार्यक्रम शासनाने हाती घ्यावे, अशी मागणीही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई रामदास जराते यांनी प्रशासनाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here