कबड्डी स्पर्धेकरिता गेले, परततांना ट्रकने दिलेल्या धडकेत दोन कबड्डीपटू ठार

1640

– कबड्डी खेळाडूंवर आयुष्याचा सामना हारण्याची दुर्दैवी वेळ
The गडविश्व
ता.प्र / (चेतन गहाने) कुरखेडा, दि.२९ : कबड्डी स्पर्धेत जिंकण्याच्या इराद्याने सहभागी झालेल्या दोन कबड्डीपटूना आयुष्याचा सामना हारण्याची दुर्दैवी वेळ आली. स्पर्धेत सहभागी होऊन गावी परतताना वाटेत अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील पुराडा- कोरची मार्गावर डोंगरगाव फाट्यानजीक २८ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. आकाश शामशाय नरोटी (वय २३) व नकुल ऐनीसिंग नरोटी (वय २२) दोघेही रा. बेलगाव घाट ता.कोरची अशी मृतकांची नावे असून विक्की फत्तेलाल तोफा (वय २३) रा. बेलगाव घाट हा जखमी आहे.
कुरखेडा तालुक्यातील रानवाही येथे नवयूवक श्रीगणेश क्रीडा मंडळातर्फे तीन दिवसांपासून कबड्डी स्पर्धा सुरु आहेत. यात ९० पेक्षा अधिक संघ सहभागी आहेत. या स्पर्धेत बेलगाव घाट संघही सहभागी आहे. २८ नोव्हेंबरला बेलगाव घाट संघ रानवाहीला गेला. मात्र, नियोजित वेळापत्रकानुसार २८ रोजी बेलगाव संघाचा सामना नव्हता त्यामुळे आकाश नरोटी, नुकल नरोटी व विक्की तोफा हे गावी परतण्यासाठी दुचाकीवरुन ट्रिपलसीट निघाले तर उर्वरित खेळाडू रानवाहीलाच मुक्कामी राहिले. दरम्यान, डोंगरगाव फाट्याजवळ एका दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. यानंतर दुचाकीवरील तिघेही खाली कोसळले. यात आकाश आणि नकुल जागीच ठार झाले तर विक्की तोफा याला गडचिरोली येथे उपचाराकरिता हलविण्यात आले आहे अशी माहिती आहे.
कुरखेडा-कोरची मार्गे छत्तीसगड ला दररोज ट्रकांची रेलचेल असते. पुराडा नंतर घाट असल्याने या मार्गावरून वाहन चालविणे कसरतच मानल्या जाते. डोंगरगाव नजीक यापूर्वीही अपघात झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here