– परिचारिकाची जागा रिक्तच, संपाचा फटका
The गडविश्व
गडचिरोली, दि.०१ : जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा आरोग्य विभागाने वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. नुकताच ३० नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा इंजेवारी येथे पोहचली त्यामध्ये आरोग्य विभागामार्फत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मात्र या शिबिरात आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून केवळ आशा वर्कर तपासणी करतांना दिसून आल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा जिल्हाभरात राबविण्यात येत आहे. या दरम्यान विविध शिबिरांचेही आयोजन करण्यात येत आहे. आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथे विकसित भारत संकल्प यात्रा पोहचली दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक कर्मचारी संपावर आहे तर एक जागा रिक्तच आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर एकही कर्मचाही सध्यास्थितीत नाही. याचा फटका विकसित भारत संकल्प यात्रेत बसताना दिसला असून या दरम्यान केवळ आशा वर्कवर संपूर्ण आरोग्य शिबिराची जबाबदारी देण्यात आल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा मानली जाणारी प्राथमिक आरोग्य यंत्रणा दुर्लक्षित आहे. इंजेवारी गावामध्ये २ हजार ते २ हजार ५०० लोकसंख्या असून दररोज अधिक रुग्ण विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र दैनंदिन वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गंभीर रुग्ण आल्यास कर्मचारी हजर नसल्यास त्याला दुसरीकडे उपचारास जावे लागत आहे. याचा आर्थिक फटका गोरगरीब रुग्णांना बसत आहे. परिचारिका, कर्मचारी यांची तात्काळ नियुक्ती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी अन्यथा कोणत्याही क्षणी आरोग्य केंद्राला कुलूप लावले जाईल किंवा रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने इंजेवारी ग्रामपंचायतचे उपसरपंच मंगेश पासेवार यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.