The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाणे ) दि.१९ : येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता आणलेला गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांना चकमा देत फरार झाल्याची घटना सोमवार १८ डिसेंबर रोजी घडली. अथक प्रयत्नानंतर सदर आरोपीस रात्रोच्या सुमारास अटक करण्यात आले आहे. प्रेनल खेमचंद कराडे (वय 22) रा. चन्ना बाकटी ता. अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा येथे दाखल झालेल्या एका गंभीर प्रकरणातील आरोपीस अटक करून वैद्यकीय अधिकाऱ्याची आरोग्य संबंधी अभिप्राय मिळविणे करिता येथील उपजिल्हा रुग्णालयात पोलीस वाहनाने घेवून पोलीस आले होते. तपासणी दरम्यान आरोपीने मळ मळ वाटत असल्याचे सांगत रुग्णालयातील खिडकी जवळ जाऊन उल्टी करण्याच्या बहाण्याने थेट रुग्णालया बाहेर उडी घेत धूम ठोकली. पोलिसांना समजेल त्या पूर्वीच तो आरोपी नजरे आड झाला. आरोपीने पळ काढला हे लक्ष्यात येताच शोधाशोध सुरू झाली. दुपार पासून सुरू असलेली शोध मोहीम रात्रभर सुरू होती. दरम्यान आरोपी शोधा – शोध करून थकलेल्या पोलीस यंत्रणेने समाजमाध्यमावर आरोपी फोटो सह आरोपी फरार बाबत माहिती प्रसिद्ध केल्याचेही कळते. सदर मेसेज परिसरात कमालीचा व्हायरल झाला. येथील लगतच्या कुंभिटोला परिसरातून सदर आरोपी गेल्याची खात्री लायक माहिती पोलिसांना मिळताच मोठ्या संख्येने पोलीस या भागात सक्रिया झाले होते. येथील आरोपीच्या संपर्कातील काही लोकांना तपासा करिता उशिरा पर्यंत पोलीस ठाणे कुरखेडा येथे बोलावून माहिती मिळविण्याचा ही प्रयत्न झाला. रात्रो उशिरा आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली असून गंभीर प्रकरणातील आरोपी पळून गेल्याने एकंदरीत येथील पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण झाला आहे.