– सोमवार पासून गोंडवाना विद्यापीठाचे राज्य आपत्ती व्यवस्थापन शिबिर
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : गोंडवाना विद्यापीठात रासेयो विभागाच्या वतीने २५ डिसेंबर २०२३ ते ०३ जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर आव्हान-२०२३ आयोजित करण्यात आलेले आहे. राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून सदर शिबीराचे आयोजन केले जात असून यावर्षी गोंडवाना विद्यापीठात प्रथमच हे आपत्ती व्यवस्थापन शिबीर होत आहे. या शिबीरास २२ विद्यापीठांमधील ५८० विद्यार्थी आणि ४२० विद्यार्थीनी स्वयंसेवक असे एकुण १००० विद्यार्थी याशिवाय ३७ पुरूष कार्यक्रम अधिकारी आणि ३७ स्त्री कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदे दरम्यान प्र.कुलगुरू श्रीराम कावळे यांनी दिली.
या शिबीराचे उद्घाटन २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता सुमांनद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे होत असून या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणुन वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधिर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, प्रमुख उपस्थिती म्हणुन कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, जिल्हाधिकारी, संजय मीना, प्र-कुलगुरू, डॉ. श्रीराम कावळे, एन. डी. आर.एफ. कमांडर, एस. बी. सींग आदी उपस्थित राहतील.
बुधवार ०३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता, सुमांनद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे या प्रशिक्षण शिबीराचा समारोप होणार असून प्रमुख अतिथी म्हणुन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार अशोक नेते, प्रमुख उपस्थिती म्हणुन आमदार देवराव होळी, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार कृष्णा गजबे, प्रादेशिक संचालक (महाराष्ट्र, गोवा) प्रादेशिक संचालनालय, रा. से. यो. पुणे डॉ. अजय शिंदे उपस्थित राहतील. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे हे उपस्थित राहतील.
१० दिवस होणाऱ्या या शिबीराची तयारी पूर्ण झालेली असून शिबीराच्या यशस्वीतेसाठी ३० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या शिबीरात पूर, संर्पदंश, अपघात, हद्द्यविकार, आग, भुकंप आदी आपत्तीच्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घेवून जिवित व वित्तहानी टाळता येईल. याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण दिले जाणार आहे. रोज योगा, मेडीटेशन, आपत्ती व्यवस्थापनाचे वर्ग, आपातकालीन परिस्थतीत लढण्याची पूर्वतयारी, आग नियंत्रित करण्याच्या विविध पध्दती, पुरपरिस्थीती हाताळण्याचे प्रशिक्षण, मोटीव्हेशनल स्पीच असा दिवसभराचा कार्यक्रम राहणार आहे. प्रशिक्षण वर्गाचे आयोजन सुमानंद सभागृह, गडचिरोली शासकिय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली व गाणली सभागृह, गडचिरोली, सुप्रभात मंगल कार्यालय, गडचिरोली येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या १० दिवस होणाऱ्या प्रशिक्षणासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे ५० तज्ञ व्यक्ती आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणार आहेत. वर्गखोलीतील शिक्षणाशिवाय गडचिरोलीतील स्थानीक तलाव,विद्यापीठ कॅम्पस परिसरात बिल्डींग डिझास्टर ऑपरेशन यांची रंगीत तालीम घेण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. ३१ डिसेंबर २०२३ रोजी सुमानंद सभागृह ते इंदिरा चौक अशी रॅली काढण्यात येणार आहे.
या शिबिरात मुंबई विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपुर, पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, राहूरी, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक, महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ, नागपुर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल विद्यापीठ, लोणेरे, कविकुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई व हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई अश्या एकुण २२ विद्यापीठाचा सहभाग राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण व राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. शाम खंडारे यांनी केले आहे.