प्रेयसीची हत्या करून स्वतःही संपविले जीवन

324

–  तिचे लग्न दुसऱ्याशी जुळल्याने होता नाराज
The गडविश्व
गोंदिया, दि.२५ : प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी जुळल्याने नाराज असलेल्या प्रियकराने आधी प्रेयसीची गळा आवळून हत्या करत नंतर स्वतःही झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथे २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. श्रीकांत महादेव कापगते (२२), रा. पुराडा, ता. देवरी असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२) रा. हलबीटोला, ता. देवरी, जि. गोंदिया असे हत्या केलेल्या त्याच्या प्रियसीचे नाव आहे.
श्रीकांत व टिकेश्वरी यांचे अनेक दिवसापासून प्रेमसंबध होते. ते दोघेही लग्न बंधनात अडकणार असे स्वप्न रंगवित असतांना टिकेश्वरीचे लग्न दुसऱ्या तरूणासोबत जोडण्यात आले. तेव्हापासून श्रीकांत आपल्या प्रेयसीला घेऊन चिंतेत होता. ती आपली व्हावी यासाठी तिला तो विनवणी करायचा. परंतु घरच्यांच्या समोर आपण बोलू शकणार नाही असे टिकेश्वरीचे म्हणणे होते. २२ डिसेंबर रोजी श्रीकांतने टिकेश्वरीला आपल्या गावी आणले व शेताकडे एकांतवास मिळेल म्हणून त्याने तिला नेले. यावेळी लग्नाचा हट्ट केला परंतु टिकेश्वरीने त्याचे न ऐकल्यामुळे त्याने तिचा गळा आवळून खून केला व नंतर त्याने स्वत: गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
श्रीकांतचे वडील विजय महादेव कापगते (५२), रा. पुराडा, ता. देवरी हे २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आपल्या शेताकडे पाणी पाहायला गेले होते असता त्यांच्या शेताच्याच बाजूला असलेले शिवचरण गुनाजी आचले यांच्या शेतात पळसाच्या झाडाला फासावर श्रीकांत लटकलेला दिसून आला. दरम्यान या प्रकरणात सालेकसा पोलिसांनी श्रीकांत महादेव कापगते (२२), रा. पुराडा, ता. देवरी या प्रियकरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here