– जयरामपूर येथे भूमी अधिग्रहण विरोधी प्रबोधन सभा…
The गडविश्व
चामोर्शी, दि.२६ : सध्या संपूर्ण जिल्ह्यामधे चर्चेचा विषय असणाऱ्या कोनसरी नजीकच्या ४ गावांची शेतकऱ्यांची सुपीक जमीन महाराष्ट्र शासन उद्योग उभे करून काही खाजगी कंपन्यांना फायदा पोहचवून देण्याच्या उद्देशाने जमीन अधिग्रहण करण्याची बळजबरी करत असताना स्थानिक लोकांनीही जमीन न देण्याचा संकल्प प्रबोधन सभेतून केला आहे.
जयरामपूर येथे २५ डिसेंबर या दिवशी प्रबोधन सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुधोली चक न.२, सोमणपल्ली, कोणसरी, मुधोली तुकुम, गणपुर या गावच्या शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेष म्हणजे या सभेला उपस्थित राहण्यासाठी एक दिवस काम बंद ठेवून महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.प्रबोधन सभेमध्ये प्रामुख्याने जल,जंगल आणि जमीन बचाव, पेसा नियम व अधिकार कायदा,भूमी अधिग्रहण कायदा,शेतकरी आणि शेतमजूर यांचे हक्क या वेगवेगळ्या मुद्यावर मार्गदर्शक म्हणून रमेशचंद्र दहिवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, अमोल मारकवार, रमेश पिंजारकर, नीकेश गद्देवार, सरपंच श्रीकांत पावडे यांनी मार्गदर्शन केले.
शेकडो शेतकऱ्यांच्या उपजाऊ जमिनी बळकावून त्यांना उपेक्षित ठेवून सरकार कोणत्या प्रकारचा विकास करू पाहत आहे? कायद्याचा भंग करून जिल्हाधिकारी देखील शेतकऱ्यांसोबत उपऱ्यासारखा व्यवहार करत आहेत हे बेकायदेशीर आहे. पेसा अधिनियमाच्या अंतर्गत असलेल्या गावांच्या जमिनी ग्रामसभेच्या परवानगीशिवाय घेणे म्हणजे कायद्याचा आणि संविधानाचा भंगच आहे असे प्रतिपादन यावेळी उपस्थित मार्गदर्शक मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमात परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य सहभागी झाले या कार्यक्रमाचे आयोजन जल, जंगल, जमीन बचाव कृती समिती जयरामपूर यांनी केले.