– पात्रता परीक्षा रद्द करुन सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळण्यासाठी उपोषण
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०१ : पात्रता परीक्षा रद्द करुन सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळण्यासाठी १ जानेवारी २०२४ पासुन विधान भवन, पुणे येथे सर्व संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण आहे.
२०२१ व २०२२ प्रमाणे २०२३ मध्ये महाज्योती संस्थेच्या वतीने देण्यात येणारी संशोधन फेलोशिप सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासुन मिळाली पाहिजे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे ३८ दिवस व नागपुर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान उपोषण करण्यात आले. दरम्यान १४ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. हायपॉवर समितीने फेलोशिप बाबत पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करून मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्या बाबत सुचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. तरी देखील २४ डिसेंबर २०२३ रोजी पात्रता परीक्षा घेण्यात आली. दरम्यान छ. संभाजी नगर येथे पेपर फुटल्या बाबतची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच २०१९ साली सेट परीक्षेत आलेली प्रश्न पत्रिकाच पात्रता परीक्षेसाठी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता प्रशासन १० जानेवारी २०२३ या दिवशी पुन्हा नव्याने ही परिपरिक्षा घेणार आहे. सदर परीपरीक्षा रद्द करुन २०२१ व २०२२ मधील निकषांवर २०२३ मधील सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासुन फेलोशिप मिळावी या मागणीसाठी १ जानेवारी २०२४ पासुन विधान भवन, पुणे येथे महाराष्ट्रातील संशोधक विद्यार्थी आमरण उपोषण करणार आहे. या उपोषणाला महाज्योति संशोधक विद्यार्थी कृती समितीने पत्रकातून पाठिंबा दर्शविला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या :
-२०२३ वर्षातील अर्ज करणाऱ्या व पात्र सर्व विद्यार्थ्यांना सरसकट व नोंदणी दिनांकापासून अधिछात्रवृत्ती मिळणे.
– २०२१, २०२२ व २०२३ या वर्षातील विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन / नोंदणी दिनांक पासून अधिछात्रवृत्ती मिळणे.
– १० जानेवारी २०२४ रोजी होणारी CET परीक्षा रद्द करण्यात यावी.