राजपथावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट, लोकप्रिय निवड श्रेणीत महाराष्ट्र विजयी

322

The गडविश्व
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथालाही सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे. सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली. यंदा संचलनात जवळपास १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळाला आहे. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आले आहे. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आला. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आला. तर यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले होते.
महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले होते. यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब भूषणावह ठरली.
महाराष्ट्राच्या चित्ररथावर पाच “जैवविविधता मानकं” दाखवण्यात आलेली. ज्यात राज्यासाठी अद्वितीय असलेल्या वनस्पती आणि प्राणी यांचा समावेश होता. सुमारे १५ प्राणी आणि २२ वनस्पती आणि फुले या चित्ररथावर प्रदर्शित करण्यात आलेले. या चित्ररथासाठी एक विशेष गाणेही तयार करण्यात आले होते. या गाण्याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा हा विशेष संदेश देण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची होती. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here