गडचिरोलीत नवमतदारांचा टक्का वाढला : अंतिम मतदार यादी प्रकशित

157

– अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांची माहिती
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणूका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभुमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावती करणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती गडचिरोली अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी दिली. अंतिम मतदार यादीच्या प्रकाशना निमित्ताने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
निवडणूका पारदर्शक आणि न्याय वातावरण पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला.
या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोंबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत ३०,५६० मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २८,४०२ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये २,१५८ मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकुण मतदारांची संख्या ८,०४,१४९ इतकी झालेली आहे. त्यानुसार एकुण पुरुष ४,०५,७०३ / स्त्रिया- ३,९८,४३६ आणि १० तृतीयपंथी मतदारांची संख्या आहे. महिला बचतगट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरूष गुणोत्तर ९७५ वरून ९८२ इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये प्रारूप मतदार यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या २,७११ (०.३४ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत ११.५१२ (१.४३ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या १,५८,५४६ (१९.७५ टक्के) होती, ती अंतिम यादीत १,६८,२३९ (२०.९२ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायम स्वरूपी स्थलांतरीत मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपुर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पुर्ण करण्यात आली. त्यानुसार १९.५५२ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यापैकी ऐशीपेक्षा अधिक वय असलेले ३,९८७ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनात आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे मतदार याद्यांमध्ये ३,५९४ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज -PSE) असल्याचे निदर्शनात आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत १,०३१ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले ( डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज – DSE) १,००६ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून २८३ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटीसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपूर्ण झालेली आहे.
दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्णनोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण ५,८९६ अर्ज ( १ एप्रिल- १,१५३, १ जुलै-१,४६१, १ ऑक्टोबर-१,७३६) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिध्द झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updation) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी आहे.
दिनांक २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यलयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी ‘मतदाता सेवा पोर्टल’या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्रे सुध्दा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा. सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षमार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्ता करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच ‘मतदाता सेवा पोर्टल’ आणि वोटर हेल्पलाइन ॲप यांवर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रसेनजीत प्रधान, उपविभागीय अधिकारी विवेक सांळुखे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here