– पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणुन 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथे अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांचे हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 18 अधिकारी व अंमलदार यांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे शौर्य पदक व एक अंमलदार यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले होते. यावेळी पदक विजेत्यांचा प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन कुमार चिंता सा. यांचे हस्ते सन्मान सोहळा पार पडला.विशेष म्हणजे आज 26 जानेवारी 2024 रोजी माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल अशा विसामुंडी येथे गडचिरोली पोलीसांकडुन ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) एम. रमेश सा. यांच्या नेतृत्वात पोमकें येमली-बुर्गी व 02 सी-60 पथकांनी 18 किमी पायी अभियान करत विसामुंडी येथे भेट देवून गावकऱ्यांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. तसेच उपविभाग भामरागड अंतर्गत इरपनार या गावात उपविभागीय पोलीस अधिकरी, भामरागड नितीन गणापूरे यांच्या नेतृत्वात पोस्टे धोडराज व 02 सी-60 पथकांनी 10 किमी पायी अभियान करत ध्वजारोहन करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला. यासोबतच गेल्या एका वर्षात नव्याने उभारलेल्या पोस्टे/पोमकें मन्नेराजाराम, पिपली बुर्गी, वांगेतुरी व गर्देवाडा याठिकाणी संबंधित पोस्टे/पोमकें चे अधिकारी व अंमलदार यांनी गावकयांसमवेत ध्वजारोहन करुन प्रजासत्ताक दिन साजरा केला. दरवर्षी माओवादी अतिदुर्गम अशा काही गावांमध्ये काळे झेंडे फडकविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांचे मनसुबे उधळून लावण्याकरीता गडचिरोली पोलीसांकडून वरील अभियान राबविण्यात आले होते. यासोबतच पोलीस मुख्यालय, गडचिरोली येथे मा. जिल्हाधिकारी संजय मीना यांचे हस्ते ध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न झाला, या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाकडुन पथसंचलन तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच गडचिरोली जिल्ह्रातील संपूर्ण पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.