गडचिरोली जिल्ह्याची वाटचाल आता विकासाकडे : जिल्हाधिकारी संजय मीणा

176

– प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हावासियांना दिल्या शुभेच्छा
The गडविश्व
गडचिरोली, दि.२७ : आत्तापर्यंत जिल्हयात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. नक्षली विचारधारांना आता जिल्हयातून हद्दपार केले जात आहे. दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि शासनाला अंगीकारले आहे. त्यामुळेच जिल्ह्याची वाटचाल आता विकासाकडे होत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले.
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हावासियांना उद्देशून ते बोलत होते. पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहन करून संपन्न झाला. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले, आता नागरिक विविध शासकीय योजना स्विकारून विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत. रोजगार निर्मितीसाठी जिल्हा गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत खनीज आधारीत उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून 82.15 कि.मी. चा मार्ग जाणार असून गडचिरोली जिल्ह्यात समृध्दी महामार्ग राज्य शासनाकडून प्रस्तावित आहे. तसेच 1888 कोटी रुपये खर्च करून वडसा – गडचिरोली या 52.68 कि.मी. ब्रॉडगेज रेल्वेमार्गाची कार्यवाही सुरू आहे. जिल्हा मुख्यालयापासून 4 कि.मी. अंतरावर ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. तसेच येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक सत्र पुढील वर्षापासून सुरू होत आहे.
विकसीत भारत संकल्प यात्रा गडचिरोली जिल्ह्यातील 9 लक्ष लोकांपर्यंत पोहचविण्यात जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. तसेच आयुष्मान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यातील 3 लक्ष 88 हजार 923 नागरिकांचे गोल्डन कार्ड तर 5 लक्ष 62 हजार 565 नागरिकांचे आभा कार्ड काढण्यात आले आहे. शासन आपल्या दारी अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील 6 लक्ष 97 हजार लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान योजनेंतर्गत 2 लक्ष 70 हजार लाभार्थ्यांना लाभ वितरण करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ‘हर घर नल से जल’ अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लक्ष 41 हजार घरांपैकी जवळपास 2 लक्ष घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात एकूण 31605 घरकुलांपैकी 28897 (92 टक्के) घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 7477 वैयक्तिक शौचालयाचे काम (89 टक्के) पूर्ण झाले आहे. तसेच 1376 सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनांपैकी 1369 (99 टक्के) योजनांचे काम पूर्ण झाले असून या बाबतीत गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत 1 लक्ष 56 हजार 105 शेतक-यांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हा दिव्यांग सहायता कार्यक्रमाची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली आणि राष्ट्रपतींच्या हस्ते स्वावलंबन कार्ड व दिव्यांग सशक्तीकरणाकरीता इतर योजनांमध्ये उत्कृष्ट जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला नुकतेच गौरविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोबाईल नेटवर्कचे जाळे युध्दपातळीवर वाढविण्यात येत असून 605 नवीन टॉवर मंजूर झाले आहे.
गडचिरोली जिल्हृयातील रोजगाराभिमुख कौशल्यआधारीत प्रशिक्षणाकरीता 170 कोटींचे सुसज्ज व अत्याधुनिक सेंटर फॉर इव्हेंशन, इनोवेशन, इन्क्युबेशन अँण्ड ट्रेनिंग सेंटरचे नुकतेच सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात 6 नक्षलवाद्यांना सुरक्षा जवानांनी ठार केले, कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमांतर्गत मागील एक वर्षात 2 लक्ष 10 हजार 795 लाभार्थ्यांपर्यंत गडचिरोली पोलिस दलामार्फत राज्य शासन पोहचले आहे. केंद्र आणि राज्य शासन यांच्या एकत्रित प्रयत्नाने गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त, मागास जिल्हा अशी ओळख पुसून विकासाच्या वाटेवर अग्रेसर होत आहे, असेही जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. यात गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, प्रशांत शिरके, महेंद्र गणवीर, संदिप कराडे, निलेश तेलतुंबडे, अजय बोडने, पोलिस विभागातील मुंशी मासा मडावी, मोहन लच्चु उसेंडी, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने मोहित बोदेले, जयंत राऊत, आर्या ठवरे, दिक्षा वाळके, सचिन रोहनकर, अनिकेत भुरसे, संजना येलेकर, प्रतिक रामटेके, उमा सहारे, हिमांद्री गायन, आरोग्य विभाग धन्वंतरी हॉस्पीटल अॅन्ड मल्टीस्पेशालीटी सेंटर, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here