नरचुली मार्गाचे खडीकरण केव्हा होणार ?

243

– नागरिकांचा सवाल, दूरावस्थेमुळे रहदारीस अडचण
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०२ : तालुक्यातील रांगी गावापासून ६ किमी अंतरावर असलेल्या आरमोरी तालुक्यातील नरचुली गावाकडे जाणारा रस्ता १० वर्षांपूर्वी रोजगार हमी अंतर्गत व वन विभागामार्फत रस्त्याचे व मोरी बांधकामाचे काम करण्यात आले मात्र निर्मितीपासून या रस्त्याची एकदाही दुरुस्ती, मुरूम व खडीकरण न केल्याने या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. परिणामी रस्त्यावर व बांधलेल्या चार ठिकाणी मोरीचे बांधकाम करण्यात आले. परंतु त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला नसल्याने रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर मुरुमाचा अथवा गिट्टीचा भरणा करण्यात आले नाही परिणामी सध्या केवळ दुचाकी वाहने ये जा करू शकत आहे. चार चाकी वाहने येथून नेता येत नाही. सदर मार्ग येथून आवागमन करणाऱ्या प्रवाशांसाठी डोकेदुखीचा ठरत आहे.
धानोरा तालुक्यातील रांगी आणि आरमोरी तालुक्यातील नरचुली या दोन गावाचा जोडणारा स्वतंत्र असा पक्का रस्ता नाही. सध्या जो रस्ता अति अस्तित्वात आहे तो फक्त पायवाट व पावसाळ्यामध्ये चिखलमय होत असल्याने हा रस्ता पूर्णतः बंद होत असते. त्यामुळे या मार्गाचे खडीकरण केव्हा होणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. रांगी ते नरचुली या मार्गाने नरचुली येथील लोक नेहमी रांगी कडे ये जा करीत असतात, कधी दैनिक खरेदीसाठी, कधी बँकेच्या कामासाठी तर कधी आठवडी बाजारा करिता मुले शाळेत व दवाखान्यात दररोज ये-जा करीत असतात. मात्र या सहा किमी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
सदर रस्त्याचे नव्याने खडीकरण करणे गरजेचे आहे तशी मागणी ही वारंवार येथील नागरिकांकडून होत आहे. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. मार्ग सुरळीत करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here