कुरखेडा : अवैध रेती तस्करांवर धडक कारवाई, एक ब्रास रेतीसह ट्रॅक्टर जप्त

820

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०५ : अवैधरित्या रेती उपसा करणाऱ्या विरोधात तहसीलदारांनी धडक मोहीम राबवित रात्रोच्या सुमारास सती नदी पात्रातून विनापरवाना रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय कुरखेडा येथे जमा करण्यात आले आहे.
कुरखेडा तालुक्यात रात्रो अंधाराचा फायदा घेत सती नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून वाहतूक होत असल्याची बाब येथील नवनियुक्त तहसीलदार रमेश कुंभरे यांच्या निदर्शनास आली होती. नायब तहसीलदार शाहिद शेख यांच्या नेतृत्वात भरारी पथक तयार करून रात्रो सती नदी परिसरात गस्त लावली होती. अवैध रेती वाहतुकीस निर्बंध घालण्याकरिता तयार केलेल्या पथकाच्या गस्ती दरम्यान गुरनोली तलाठी साजा. क्रमांक १ मधील अरततोंडी मार्गावर असलेल्या पोल्ट्री फार्म जवळ ११.३० वाजताच्या सुमारास अवैधरित्या १ ब्रास रेती भरून वाहतूक करीत असलेले ट्रॅक्टर आढळले. ट्रॅक्टर थांबवून चालक यास वाहतूक परवाना संदर्भात विचारणा केली असता परवाना नसल्याची बाबा चालक श्रीहरी पेंदाम रा. मेंढा, ता. कुरखेडा याने कबूल केल्याने सदर ट्रॅक्टर पंचनामा करून जप्ती करत तहसील कार्यालय कुरखेडा येथे जमा करण्यात आले आहे. सदर ट्रॅक्टर हा गुरनोली येथील राहुल खूने यांच्या मालकीचे असल्याचे समजल्याने त्यांना महसूल अधिनियम चे उल्लंघन केल्या प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) अन्वये दंड व भारतीय दंड संहिता १९८० मधील तरतुदी नुसार फौजदारी गुन्हा दाखल का करण्यात येवू नये अशी नोटीस बजावली आहे.
सदर कार्यवाही तहसीलदार रमेश कुंभरे यांच्या मार्गदर्शनात, नायब तहसीलदार शाहिद शेख यांच्या नेतृत्वात पथकातील मंडळ अधिकारी एल. बी. उसेंडी, तलाठी बी.आर. महाका, तलाठी सी.एस. ठाकरे यांचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here