– वेळीच उचल न झाल्यास अवकाळी पावसाने खराब होण्याची शक्यता .
गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ११ : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत धानोरा तालुक्यातील रांगी, मोहली, सोडे, धानोरा, दूधमाळा, चातगाव, कारवाफा, सुरसुंडी, मुरूमगाव या संस्थेमध्ये धानाची आवक वाढल्याने संस्थांचे गोडाऊन हाउसफुल झाले आणि उरलेले धान्य मोकळ्या जागेत उघड्यावर ठेवलेले आहेत. तर काही संस्थांना गोडावून नसल्याने उघड्यावर खरेदी करून पटांगणात ताडपत्री झाकून ठेवलेल्या धानाची उचल महामंडळ द्वारे वेळीच व मुदतीत होत नसल्याने मोठ्या प्रमाणात टूट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महामंडळाने वेळीच धान्याची उचल करुन सरकारचे करोडो रुपयांची होणारी नुकसान थांबवावी.
धानोरा तालुक्यातील काही संस्था कडे गोडावून आहेत पण ते धान्याने भरलेले आहेत. उरलेले धान संस्थेच्या पटांगणात उघड्यावर ठेवलेले आहेत. त्या धानावर अनेक लोकांची चोरटी नजर असते. काही संस्थाकडे कोणत्याही पद्धतीचे गोडावून नाही त्याचे संपूर्ण धान्य मोकळ्या जागेत फक्त ताडपत्री झाकुन ठेवलेल्या आहेत. अवकाळी पाऊस झाल्यास यांची झळ संस्थांना सोसावी लागते. संबंधित धान्याची उचल करण्याबाबत महामंडळाला पत्रव्यवहार केल्याचे संस्था सांगतात. पण महामंडळाच्या चुकीमुळे खरेदीदार संस्थांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. आधारभूत धान खरेदी योजना आदिवासी उपयोजन क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ एजंट म्हणून स्थानिक सहकारी संस्थामार्फत राबविली जाते. या खरिप हंगामात धान्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. संस्थेचे गोदाम व पटांगणात खरेदी करण्यात आलेल्य धानाची उचल दोन महिन्यांच्या कालावधी करण्याचे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र महामंडळकडून धानाची उचल होण्यास विलंब होत असते.
उचल होण्यापूर्वी ऊन, वादळ, अकाळी पाऊस यांचा सामना धान करतात. त्यासोबत उंदिर, घुस पोखरून घेतात यामुळे टूट येते. याचा नाहक भुर्दंड संस्थांकडून वसूल करण्यात येतो. त्यामुळे संस्थांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तालुक्यातील कोणतीही संस्था स्थापनेपासून फायद्यात नसुन सर्वच तोट्यात दिसुन येतात. तालुक्यात महामंडळाच्या उप प्रादेशिक कार्यालय अंतर्गत रांगी, मोहली, धानोरा, सुरसुंडी, दूधमाडा, चातगाव, कारवाफा, पेंढरी, मुरूमगाव, सोडे, या संस्थामार्फत खरीप हंगाम २०२३ /२४ मध्ये महामंडळाद्वारे खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र खरेदी करण्यात आलेल्या बहुतांशी धान संस्थांच्या पटांगणात उघड्यावर झाकून ठेवण्यात आले आहे. खरेदी योजना सुरू होऊन चार महिन्याचा कालावधी उलटला मात्र महामंडळने अद्याप धानाची उचल सुरू केलेली नाही. पटांगणावर उघड्यावर असलेल्या धानाला ऊन, अवकाळी पाऊस यामुळे तूट निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा भुर्दंड संस्थांकडून वसूल केला जातो. तरी रांगी येथील उघड्यावर झाकून ठेवलेल्या धान्याची लवकरात लवकर उचल करावी अशी संस्था ची मागणी आहे.