टी.सी.एस. (TCS) कंपनीमार्फत घेण्यात आलेली ‘ही’ परीक्षा शासनाने केली रद्द

206

गैरप्रकारामुळे घेतला निर्णय, उमेदवारांकडून केली होती मागणी
The गडविश्व
मुंबई दि. १५ : “जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” पदासाठी २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील अशी माहिती मृद व जलसंधारणचे आयुक्त तथा राज्यस्तरीय निवड समिती अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी दिली.
मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट “ब” (अराजपत्रित) संवर्गातील ६७० पदे सरळसेवेने भरण्यासाठी १९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा शासन मान्य टि. सी. एस. कंपनीमार्फत, राज्‍यातील २८ जिल्ह्यातील एकूण ६६ केंद्रांवर २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.
२१ फेब्रुवारी रोजी सत्र ०१ (सकाळी ९.०० ते ११.००) दरम्यान ARN Associate, ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेश पत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस A, B, C, D अशा स्वरुपात उत्तरेसदृष्य माहिती असल्याचे आढळून आले होते. या अनुषंगाने, गृह विभागाच्या अहवालानुसार, नांदगाव पेठ, अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार आजपावेतो एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली असून यामध्ये टिसीएस कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ARN Associate, ड्रिमलँड, नांदगाव पेठ, अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. सदर परीक्षा घेणाऱ्या टिसीएस कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच या परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. या प्रकरणी अनेक उमेदवारांकडून २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व या परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी, अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर केलेली आहे.
या परीक्षेत झालेला गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी, एकूण परीक्षा कार्यपध्दती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही संशय निर्माण करणारा ठरला आहे. या गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्या, मे. टि.सी.एस (TCS) या कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ARN Associate या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शनी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो. यामुळे ही परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी याबाबत सांगोपांग विचार होऊन, “जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित” या पदासाठी २० व २१ फेब्रुवारी २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. तरी सर्व संबंधीत परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी,असेही आयुक्त चव्हाण यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here