– जल जागृती सप्ताहाचा समारोप
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : पाण्याची बचत ही काळाची गरज असून पाणी बचत मोहिमेत नव्या पिढीचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांनी आज व्यक्त केले.
जलसंपदा विभागातर्फे जिल्ह्यामध्ये 16 ते 22 मार्च दरम्यान “जल जागृती सप्ताह” राबविण्यात आला. या सप्ताहाचा समारोप धनाजी पाटील यांच्या हस्ते जलसंपदा विभागाच्या प्रांगणात आज करण्यात आला. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे, सहायक प्राध्यापक डॉ. सविता सादमवार, जलसंवर्धन उपक्रमातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, प्रकाश अर्जुनवार, जिल्हा नेहरू केंद्राचे अमित पुंडे, प्रा. श्रीमती बुटले, उपकार्यकारी अभियंता गणेश परदेशी, सारिका पानतावणे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी पाटील यांनी पुढे बोलतांना पाण्याची बचत, संवर्धन व काटकसरीने वापर करण्यासोबतच प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहन केले.
या उपक्रमांतर्गत आठवडाभर जल जागृती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने ऑनलाईन वेबिनार मध्ये पाण्याचे महत्व व संवर्धन या विषयी मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह, नरेंद्र चुघ, रमाकांत कुलकर्णी, सुमंत पांडे यांनी मार्गदर्शन केले तसेच कोटगल बॅरेज प्रकल्प स्थळी जलजागृती सप्ताह अभियान अंतर्गत शासकीय तंत्रनिकेतन, गडचिरोली च्या स्थापत्य अभियांत्रिकीचे ७८ विद्याथी व शिक्षक वर्ग यांची क्षेत्र भेट घेऊन जल जागृती चा उपक्रम राबविण्यात आला. १९ मार्च रोजी कोटगल बॅरेज प्रकल्प स्थळी जल जागृती सप्ताह निमित्य संधानकातील पाण्याची गुणवत्ता व पाण्याचा योग्य वापर संबधी गुण नियंत्रण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याशिवाय चित्रकला स्पर्धा, चर्चासत्रे, कार्यशाळा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, जलप्रबोधन, जलदिंडी व प्रभात फेरी इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. यातील विविध स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना मान्यवर अतिथींच्या हस्ते यावेळी बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला संबंधीत अधिकारी, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.