-अवैध व्यवसाय बंद करण्याची दिली तंबी
The गडविश्व
गडचिरोली, दि.२३ : चामोर्शी तालुक्यातील सगणापुर भे. या गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. वारंवार सूचना करूनही गावात अवैध व्यवसाय सुरूच असल्याने अखेर महिलांनी गावातून रॅली काढत दारूविक्री बंद करण्याचे आवाहन केले. सोबतच दारूविक्रेत्यांच्या घरावर हल्लबोल करून तत्काळ अवैध व्यवसाय बंद करा अन्यथा पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा इशारा दिला आहे.
सगणापुर भे.येथे दिवसेंदिवस दारू विक्रीचे व दारू पिण्याचे प्रमाण वाढत होते. परिणामी विविध समस्या उदभवल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले. या सर्व गोष्टीला कंटाळून गावातील महिला एकत्रित आल्या व ग्रापंचायत सरपंच पार्वता कन्नाके, पोलीस पाटील तन्वी कोडपे यांना निवेदन देऊन दारू विक्री बंद करण्यास सांगितले. तसेच सरपंच यांनी महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन अवैध दारूविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला. सोबतच दारू विक्रेता मुजोरीने दारू विक्री केल्यास पहिला दंड २० हजार रुपये व दुसऱ्यांदा दारू मिळाल्यास ३० हजार रुपये, तिसऱ्यांदा दारू मिळाल्यास ५० हजार रुपये दंड व कायदेशीर कार्यवाही करण्याचे ठरले. तसेच गाव संघटनेची कार्यकारिणी गठीत करून अध्यक्षपदी तन्वी कैलास कोडापे तर सीमा आभारे यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ चमूसह तंटामुक्ती चे अध्यक्ष पांडुरंग लक्ष्मण पोरटे यांनी दारू विक्री बंद करण्याची गरज काय आहे हे समजावून सांगितले. दारू चे दुष्परिणाम येणाऱ्या पिढीवर कसे होतात या बाबत माहिती दिली. त्यांनतर निर्णयाची अंमलबजावणी करीत गावातील शेकडो महिलांनी रॅली काढत विक्रेत्यांच्या घरावर मोर्चा काढला. यावेळी गावातील विक्रेत्यांना तत्काळ अवैध व्यवसाय बंद करण्याची तंबी देण्यात आली. यावेळी सरपंच पार्वताबाई कन्नाके, ग्रामपंचायत सदस्य निकिता प्रकाश गेडाम, तंटामुक्ती चे अध्यक्ष व उपाध्यक्ष, पोलिस पाटील तन्वी कोडापे, उपसरपंच रेवती पोरटे, तंटामुक्ती चे उपाध्यक्ष दामोधर आभारे, स्पार्क कार्यकर्ते पल्लवी चुधरी उपस्थित होत्या.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )