गडचिरोली : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दारुसह १ कोटी ६३ लाखांचा मुद्देमाल जप्त , एका अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

757

गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारसंघात 88 पथके
The गडविश्व
गडचिरोली, दि.०२ : लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या काळात गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर विभाग, अमली पदार्थविरोधी विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकामार्फत संशयास्पद व्यक्ती व मोटारी थांबवून ठिकठिकाणी नाक्यांवर तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईत जिल्ह्यात १ मार्चपासून आतापर्यंत १ कोटी ६३ लाख ४५ हजार रुपये किमतीचे दारू, अमली पदार्थ व इतर मौल्यवान एवज जप्त करण्यात आला.
जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत पोलिस विभागामार्फत ४६ हजार ३१८ लिटर दारू व राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत ३ हजार ९७५ लिटर अशी एकूण ५० हजार २९३ लिटर दारू जप्त करण्यात आली असून त्याची किंमत ७९ लाख ९४ हजार रुपये आहे. तसेच ८३ लाख ५० हजार किमतीच्या इतर मुद्देमालाचा समावेश आहे. अमली पदार्थांच्या विक्रीवरही पोलिसांचे बारीक लक्ष असून या कारवाईत ९३ ग्रॅम तंबाखुजन्य अमली पदार्थ जप्त केले आहेत
जिल्ह्यात ४२ तर लोकसभा मतदार संघात ८८ पथके नेमण्यात आली आहेत. यात व्हिडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी) २९, भरारी पथक (एफएसटी) २४, स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी) २९ व ६ श्राव्य पथक(अेटी) पथकांचा समावेश आहे. याशिवाय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष यांचेमार्फतही निवडणूक गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कालावधीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरण्यात येणारी रोख रक्कम, मद्य आणि अन्य प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबतच्या घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, जाहिरातींचे पुर्वप्रमाणिकरण करणे, नियंत्रण कक्षाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करणे आदी कामे या पथकांच्या माध्यमातून केली जात आहे.
याशिवाय आचारसंहिता भंग बाबत सिव्हीजिल ॲपवर एक तक्रार नोंदविण्यात आली आहे तर अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलिस स्टेशनला एक अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सीव्हिजिल ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर पहिल्या १०० मिनिटांतच कार्यवाही केली जात असल्याने, निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी सीव्हिजिल ॲपवर तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #loksabhaelection2024 #gadchirolipolice )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here