–दारुसह मुद्देमाल नष्ट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : अहेरी तालुक्यातील चेरपल्ली गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावात चोरट्या मार्गाने दारूची विक्री सुरू असल्याची भनक लागताच गाव संघटनेच्या महिलांनी अहिंसक कृती करीत ५ विक्रेत्यांकडील देशी-विदेशी दारुसह गुळंबा पकडून नष्ट केला.
चेरपल्ली येथे मुक्तिपथ गावसंघटना व ग्रामस्थांनी आपल्या गावात अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित केला. त्यानुसार गाव संघटनेच्या माध्यमातून विक्रेत्यांकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. पुन्हा गावात अवैध दारूविक्री न करण्याची सूचना सुद्धा देण्यात आली होती. तरीसुद्धा गावातील ५ विक्रेते चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेच्या महिलांनी विक्रेत्यांना धडा शिकविण्याचा निर्णय केला. त्यानुसार महिलांनी बैठकीचे आयोजन करून अहिंसक कृतीचे नियोजन केले. गावातील ५ विक्रेत्यांच्या घर परिसराची पाहणी केली असता, जवळपास 12 हजार रुपये किमतीचा देशी विदेशी दारुसह, गुळंबा या प्रकारचा मुद्देमाल मिळून आला. यावेळी पूर्ण मुद्देमाल नष्ट करीत पुन्हा दारूविक्री केल्यास दारुबंदी कायद्यानुसार कार्यवाही करू असे ठणकावून सांगण्यात आले. यावेळी गावातील पोलीस पाटील आनंदराव सूनदकर, गावसंघटन अध्यक्ष संगीता रामटेके, सुमन सिडाम छाया करपेत व इतर सदस्य ,मुक्तीपथ तालुका संघटक राहुल महाकुलकर , प्रेरक नंदिनी आशा, भूषण गौरि उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)