दारूशाहीला पाडा, लोकशाहीला वाचवा

224

-डॉ. अभय बंग यांचे मतदारांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १३ : १९ एप्रिलला गडचिरोली जिल्ह्याचे जवळपास ८ लक्ष मतदार लोकशाहीच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत आणि मतदान करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या एकूण १० उमेदवारांपैकी आपल्याला निवड करायची आहे. मतदान जरूर करा, ते आपले नैतिक कर्तव्य आहे व राजकीय अधिकार आहे. पण मतदान करतांना जर आपण होश मध्ये नसलो आणि दारूच्या नशेत असलो तर आपलं मत वाया जाईल. यामुळे स्वत:चं व लोकशाहीचे नुकसान होईल. म्हणून कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, दोन पैशाच्या दारू साठी आपलं अमूल्य मत विकू नका. असे आवाहन डॉ. अभय बंग यांनी मतदारांना केले आहे.
जो तुम्हाला दारू पाजेल तो तुम्हाला भ्रष्ट्र करतो आहे; म्हणून त्या उमेदवाराला तर हमखास मत देऊ नका. या जिल्ह्यातील ४ लक्ष स्त्री मतदारांचा हा संकल्प आहे. ‘जो पाजेल माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’. जो उमेदवार पाजेल दारू त्याला मत देऊच नका. सोबतच लोकसभा निवडणुकी साठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना ‘मुक्तिपथ’ तर्फे व ‘जिल्हा दारुमुक्ती संघटने’ तर्फे आम्ही असं आवाहन करतो की, तुम्ही सगळ्या मतदारांना वचन द्या कि, “मी निवडणुकीसाठी दारू पाजणार नाही, आणि निवडून आलो आणि नाही आलो तरी दारूबंदीला समर्थन देइन, बळकट करेन”.
निवडणूक ही मतदारांना आपलं हित साधण्याची संधी आहे. म्हणून ‘लोकशाही हवी आहे की, दारुशाही हवी’? हा विचार केला पाहिजे. जो स्वत: दारू पितो व जो दारू विकतो किंवा जो दारूबंदी उठवून स्वत: पैसे कमवू इच्छीतो हे सर्व नेते जनतेच्या हिताच्या विरुद्ध आहेत. त्यांना निवडणूक भाषणामध्ये प्रश्न विचारा की, तुम्ही दारूबंदी का उठवू इच्छित होते? आमचे नुकसान का करू इच्छित होते?
राजकीय नेत्यांना हे कळलं पाहिजे की, या जिल्ह्याच्या जनतेला दारू नको आहे आणि ते जर दारूबंदी उठवण्याची भाषा बोलतील, दारू विकण्याची भाषा बोलतील तर या जिल्ह्याची जनता अशा राजनीतिक नेत्याला घरी बसवेल, त्यांना मत देणार नाही. म्हणून राजनीतिक नेत्याला सुद्धा निवड करावी लागेल की, त्यांना निवडून यायचे आहे की, दारूमधून पैसा कमवायचा आहे. दोन्ही गोष्टी करता येणार नाही. म्हणून या निवडणुकी मध्ये आपण दारूशाहीला पाडू आणि लोकशाहीला वाचवू. निवडणूक दारूमुक्त करू.

( #thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath #loksabhaelection2024)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here