डॉ. आंबेडकरांचे कार्य देशाच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत महत्त्वाचे : डॉ. शैलेंद्र लेन्डे

124

-महामानव डॉ. आंबेडकर यांच्या महत्वपुर्ण ग्रंथाच्या प्रदर्शनीचे उद्घाटन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : बाबासाहेबांचा कालखंड नकाराचा, अभावाचा, वंचित, उपेक्षितपणाचा आणि यातनांचा होता. बाबासाहेबांच्या कृतीमध्ये आधुनिक भारताच्या पुन:निर्मितीची तत्वे आहेत. त्यांच्या भावना, संवेदना, कल्पना आणि विचार नवदृष्टी देणारे असून बाबासाहेबांचे संपूर्ण कार्य देशाच्या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख तथा प्रमुख वक्ते डॉ. शैलेंद्र लेन्डे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची केलेली पुनर्रचना ” या विषयावर परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ. शैलेंद्र लेंडे, तसेच कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे, व्यवस्थापन परीषदेचे सदस्य डॉ. प्रशांत मोहीते उपस्थित होते.
डॉ. शैलेंद्र लेन्डे म्हणाले, डॉ. बाबासाहेबांचे कार्य लोकांच्या मनापर्यंत पोहोचले आहे. बाबासाहेब केवळ गीतकरांसाठी, लोककवींसाठी प्रेरणा नाही, तर संपूर्ण भारताच्या एकंदरीत भावना, विचार, संवेदना आणि कल्पना या सगळ्या घटकांना बदलविणारे युगपुरुष आहेत. बाबासाहेब घटनेचे शिल्पकार आहेत. डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाचा आणि विवेकाचा वसा दिला आहे. या वसाच्या आधारावर जगाचे नवनिर्माण झाले आहे. त्या विचारांना समजून घेत स्वतःला पुढे आणण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
डॉ. आंबेडकरांचा कालखंड हा नकाराचा, अभावाचा, यातनांचा व अंधाराचा होता. अशा नकाराला व अंधाराला दूर करण्याचे कार्य या महामानवाने केले. डॉ. बाबासाहेबांच्या सर्व लेखनाचा चिंतनाचा, मंथनाचा गाभा विचारशीलता आहे. अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी 1920 मध्ये मूकनायक पाक्षिक काढले ही त्यांची भूमिका महत्वपूर्ण आहे. तसेच महाड चवदार तळ्याच्या आंदोलनातून दलितांच्या न्याय हक्कासाठी पुढे आले. बाबासाहेबांनी दलितांच्या मुक्ती लढ्यापासून कार्याला सुरुवात केली. गुलाम असणाऱ्या घटकाला मुक्त करणे हा त्यांच्या कार्याचा गाभा राहिला आहे. असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय स्थानावरून बोलतांना प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, स्वतंत्र भारताची सार्वभौम राज्यघटना लिहून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार ठरले. डॉ.आंबेडकरांनी समाजातील वंचित, शोषित, पीडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून भावी पिढीपर्यंत त्यांचे कार्य व विचार पोहोचविण्याची गरज असून त्यांच्या जयंतीनिमीत्त महामानवाने केलेल्या कार्याला ऊजाळा देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख दिलीप बारसागडे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. हेमराज निखाडे यांनी तर आभार कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी मानले. प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर सुप्रसिद्ध गायक प्रफुल्ल सांगोडे यांनी भारतीय घटनेचा तु शिल्पकार हे अभिवादन गीत गायले.
याप्रसंगी कार्यक्रमाला विविध विभागाचे विभाग प्रमुख विद्यापीठातील प्राध्यापक, सहा. प्राध्यापक व परिसरातील मान्यवर मंडळी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पुस्तिकेचे विमोचन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख डॉ. दिलीप बारसागडे लिखीत B.R.Ambedkar A Critical study या पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण

विद्यापीठाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमीत्त निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक जनसंवाद विभागाचा विद्यार्थी सुरज दहागांवकर, द्वितीय क्रमांक रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थींनी प्रिया मुरकुटे तर तृतीय क्रमांक भौतिकशास्त्र विभागाचा विद्यार्थी मार्शल उराडे यांनी पटकाविला. तर चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक रसायनशास्त्र विभागाची विद्यार्थींनी प्रियंका विश्वास, द्वितीय क्रमांक उपयोजित अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी दुणेय किरमीरवार तर तृतीय क्रमांक इंग्रजी विभागाची विद्यार्थींनी सोनाली टोकलवार हिने पटकाविला. या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gondwanauniversity #loksabhaelection)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here